स्वामी चिंचोली (भिगवण), प्रतिनिधी – शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक टप्पा गाठत स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ‘स्वायत्त’ (Autonomous) संस्थेचा दर्जा बहाल केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या संस्थेला शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून हा दर्जा लागू होणार असून, यासंदर्भातील अधिकृत आदेश यूजीसीने २९ जुलै २०२६ रोजी जारी केला.

यूजीसीच्या स्वायत्त महाविद्यालय नियमावली-२०२३ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, ६ जुलै २०२६ रोजी झालेल्या स्थायी समितीच्या शिफारशीनंतर संस्थेला ही मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अत्यल्प महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असून, त्यामध्ये दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा समावेश झाल्याने संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
स्वायत्त दर्जामुळे संस्थेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अनुषंगाने उद्योगाभिमुख, कौशल्याधारित आणि काळानुरूप अभ्यासक्रम विकसित करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. तसेच नवीन पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा व प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास, स्वतंत्र परीक्षा प्रणाली राबविण्यास, सातत्यपूर्ण मूल्यमापन, संशोधन, इंटर्नशिप आणि कौशल्य विकास उपक्रमांना गती देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होणार आहेत.

संस्थेने गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकन, परिषदांचे आयोजन, नामांकित विद्यापीठे व उद्योग संस्थांशी सामंजस्य करार, शिक्षक प्रशिक्षण, संशोधन आणि गुणवत्ता वृद्धीचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. त्याचाच परिपाक म्हणून यूजीसीने संस्थेला हा बहुमानाचा स्वायत्त दर्जा प्रदान केल्याचे मानले जात आहे.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. रामदास मधुकर झोळ यांनी स्वायत्त दर्जा मिळविण्यासाठी परिश्रम घेतलेल्या प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि सर्व हितचिंतकांचे अभिनंदन व आभार मानले.
प्रा. झोळ म्हणाले, “स्वायत्त दर्जा ही केवळ संस्थेची उपलब्धी नसून ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाला मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील मान्यता आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे, कौशल्याधारित आणि संशोधनाभिमुख शिक्षण देण्यासाठी दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स कटिबद्ध राहील.”

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध होणार असून, परिसराच्या सामाजिक-आर्थिक विकासालाही चालना मिळेल, अशी भावना विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे.

.

.

.

.

.

