प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी कारखाना विक्री होऊ देणार नाही -संचालक मंडळाचा निर्धार
करमाळा, प्रतिनिधी – आदिनाथच्या सभासदांनी विश्वासाने कारखाना आमच्या ताब्यात दिला असून सभासदांच्या विश्वासात तडा जाऊ न देता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची लिलाव प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने थांबवून तो सहकारी तत्त्वावर चालावा यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचा निर्वाळा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.

कर्जाच्या डोंगरामुळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या आणि मागील काही दिवसांपासून लिलावाची नोटीस प्रसिद्ध झालेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाच्या भूमिकेबद्दल तालुक्यासह जिल्हाभरात विविध चर्चांना ऊत आला आहे. या चर्चांतून चेअरमन आमदार पाटील यांच्यासह विद्यमान संचालक मंडळावर होत असलेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर रविवार दि.२ रोजी जेऊर येथे पत्रकार परिषद घेतली गेली. या पत्रकार परिषदेत चेअरमन आ.पाटील यांच्यासह संचालक मंडळाने कारखान्याच्या सद्यस्थितीचा खुलासा केला.

यावेळी पुढे बोलताना आ.पाटील यांनी सांगितले की, कारखाना लिलावात घेण्यासाठी काहीजण इच्छुक असून ओंकार शुगरचे बाबूराव बोत्रे पाटील यांनी या लिलाव प्रकियेत सहभाग घेऊन ४५० कोटीची मालमत्ता असलेला आदिनाथ १२५ कोटीत विकत घेण्याचा घाट घातला आहे. मात्र आम्ही आदिनाथ सह साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत विकला जाऊ देणार नाही. राजकीय शक्तीसह कायदेशीर लढा लढून आदिनाथची लिलाव प्रक्रिया थांबवण्यासाठी संचालक मंडळाची प्रयत्न सुरू आहेत. याउपरही लिलाव प्रक्रिया झाली तर संबंधितांचा प्रवेश कारखान्यात होणार नाही यासाठी संचालक मंडळ पूर्ण ताकतीने विरोध करणार आहे.

कारखाना सुरू करण्यासाठी कर्ज प्रक्रियेसह इतर बाबींमध्ये स्थानिक गटांचे सहकार्य होण्यापेक्षा कारखाना चालू झाला तर आपले अस्तित्व धोक्यात येईल या भीतीने आडकाठीच झाल्यामुळे अद्याप कारखाना सुरू होऊ शकला नाही. तरीही लिलाव प्रक्रियेच्या स्थगितीनंतर कारखाना सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आ. पाटील यांच्यासह आदिनाथचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, संचालक डॉ. हरीदास केवारे, विजयसिंह नवले, देवानंद बागल, डॉ.अमोल घाडगे यांनीही संचालक मंडळात कोणतीही फूट नसून संचालक मंडळ एकसंघ राहुन कारखान्याच्या खाजगीकरणास विरोध करणार असल्याचे निक्षुन सांगितले.

या पत्रकार परिषदेला आदिनाथचे संचालक राहुल सावंत, किरण कवडे, दत्तात्रय गव्हाणे, दत्ताबापू देशमुख, श्रीमंत चौधरी, रवीकिरण फुके, आबासाहेब अंबारे, हनुमंत सरडे, रामेश्वर तळेकर, महादेव पोरे, संतोष खाटमोडे-पाटील आदी जण उपस्थित होते.

.

.

.

