कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्याची मागणी
करमाळा, प्रतिनिधी – शहरात घंटागाड्यांच्या अपुऱ्या वारंवारतेमुळे शहरातील दुकानदारांसह नागरिक जमा झालेला कचरा शहरालगतच्या पुलांच्या बाजूला आणून टाकतात. हाच कचरा पुन्हा ओढ्यांमध्ये जात असल्याने पालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेला नालेसफाईचा खर्च व्यर्थ ठरत आहे.

करमाळा शहरात बहुतेक प्रभागांत नगरपालिकेची घंटागाडी एक दिवसांआड कचरा संकलनासाठी येते. दरम्यान कचरा मोठ्या प्रमाणात संकलित होत असल्याने शहरातील दुकानदार व नागरिक अतिरिक्त कचरा स्वतःहून शहरालगत असलेल्या पुलांलगत टाकतात. या ठिकाणी असलेले मोकाट श्वान हा कचरा हुंगुन त्यातील बांधलेल्या कॅरीबॅग उचलून रस्त्यावर इतस्ततः विखुरतात. मोठ्या संख्येने असलेले हे श्वान रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांसाठी डोकेदुखी ठरत असून अनेक वेळा या श्वानांमुळे अपघातही होतात.

त्यामुळे करमाळा शहरात नगरपालिकेने घंटा गाड्यांची वारंवारता वाढवण्याची आणि शहरालगत असलेल्या पुलांवर नागरिकांना कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

पुलांलगत टाकलेला कचरा हुंगणाऱ्या श्वानांच्या उपद्रवामुळे मौलालीचा माळ रस्त्यावरून दुचाकीवरून करमाळा शहराकडे निघालेल्या माझ्या मुलाचा गंभीर अपघात झाला असून त्यामुळे मला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. करमाळा नगरपालिकेने या पुलावरून कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्याची गरज आहे.
-गणेश फलफले,
नागरिक, करमाळा.

घंटा गाड्यांच्या कमी वारंवारतेमुळे दुकानातील कचरा तसाच साठून राहतो. नाईलाजाने हा साठलेला कचरा आम्ही मौलालीचा माळ रस्त्यावरील पूला जवळून खाली टाकावा लागतो.
-एक दुकानदार,
करमाळा.

.

.

.

.
