न्यायालयाच्या आदेशाने रावगाव येथील दहा जणांवर गुन्हा दाखल
करमाळा, प्रतिनिधी – वडिलांनी आत्याकडून बक्षीसपत्राने घेतलेल्या जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीची करमाळा पोलिसांकडून दखल घेतली न गेल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी रावगावच्या दहा जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत जखमी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

याबाबत शुभम वसंत केकान (वय-26, रा. रावगाव, ता.करमाळा) यांनी करमाळा न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. केकान यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील मयत वसंत निवृत्ती केकान आणि चुलत आजोबा अशोक केकान यांनी वसंत यांच्या आत्या सरूबाई पांडुरंग फुंदे यांची रावगाव येथील ग.नं.२५५ पैकी ९ हे.३८ आर जमीन बक्षीसपत्राने घेतली होती. याबाबत आरोपींनी तहसीलदार करमाळा तसेच करमाळा न्यायालयात प्रकरणे दाखल केली होती. मात्र महसूल व न्यायालयीन वादात यश न आल्याने आरोपी फिर्यादीच्या कुटुंबावर चिडून होते. यातूनच आरोपी हे फिर्यादीचे वडील व चुलत आजोबा यांना ग.नं.२५५ मधील वादग्रस्त शेती वहीवाटण्यास प्रतिबंध करत जीवे मारण्याची धमकी देत होते.

दरम्यान दि.20/06/2026 रोजी दुपारी 04:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व मयत वसंत हे त्यांच्या मालकीच्या रावगाव येथील ग.नं. 255 पैकीच्या शेतजमिनीत ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करत असताना आरोपी ज्ञानेश्वर दिनकर ढाकणे, महादेव उत्तम ढाकणे, कल्याण उत्तम ढाकणे, जयदत्त श्रीमंत ढाकणे, सुमित मधुकर ढाकणे, दिनकर नामदेव ढाकणे, अरुणा मधुकर ढाकणे, उर्मिला श्रीमंत ढाकणे, कुशवार्ता दिनकर ढाकणे व वंदना ज्ञानेश्वर ढाकणे या सर्वांनी त्यांना प्रतिबंध करून जीवे मारण्याची धमकी देत लाथा बुक्क्यांसह दगड, धारदार चाकूने मारहाण केली होती.

सदर प्रकारानंतर फिर्यादी व इतर जखमी लोक सायंकाळी 05:30 वाजण्याच्या सुमारास करमाळा पोलीस ठाणे येथे वरील आरोपींविरुद्ध फिर्याद नोंदवण्यासाठी गेले असता पोलिसांनी फिर्याद नोंदवून न घेता फिर्यादींना वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे फिर्यादी व जखमी लोक यांनी कॉटेज हॉस्पिटल करमाळा येथे वैद्यकीय उपचार घेतले. त्यानंतर दि.२१/०६/२५ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व जखमी लोक वरील आरोपींविरुद्ध करमाळा पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी गेले होते. परंतु पोलिसांनी आरोपींच्या राजकीय दबावापोटी फिर्याद नोंदवून न घेता त्यांना हाकलून लावल्याचे फिर्यादीने या अर्जात नमूद केले आहे.

त्याच दिवशी रात्री 09:00 वाजण्याच्या सुमारास आरोपींच्या मारहाणीमुळे फिर्यादीचे वडील वसंत यांना तीव्र वेदना होऊ लागल्यामुळे त्यांना करमाळा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर दि.२२ रोजी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते.

मयत वसंत यांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये मारहाणीमुळे बरगड्या फ्रॅक्चर झाल्याचे नमूद आहे. त्यानंतर देखील फिर्यादी हे वेळोवेळी करमाळा पोलीस ठाणे येथे आरोपींविरुद्ध फिर्याद देण्यासाठी गेले असता आरोपींच्या राजकीय दबावामुळे पोलिंसानी फिर्याद नोंदवून न घेता आरोपींचीच खोटी केस फिर्यादी शुभम व कुटुंबीयांवर दाखल केली होती.

त्यामुळे फिर्यादीने दि. 04/07/2026 रोजी पोलीस निरीक्षक करमाळा, दि. 08/07/2026 पोलीस उप-अधीक्षक करमाळा तर दि. 08/07/202 रोजी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचेकडे समक्ष लेखी फिर्याद दिली होती. तरी देखील पोलीसांनी कोणतीही दखल न घेतल्याने फिर्यादीने ॲड. प्रमोद बलभीम जाधव यांच्या मार्फत न्यायालयात फिर्याद दाखल केल्याचे शुभम केकान यांनी सांगितले आहे.

वरील आरोपींनी फिर्यादी शुभम यांच्यासह इतर जखमी यांना बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व वसंत निवृत्ती केकाण यांचा खून केला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे तसेच पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केल्याबाबत त्यांच्याकडून खुलासा अहवाल मागवून घेणे आवश्यक असल्याचे फिर्यादीचे वकील ॲड . जाधव यांनी मा. न्यायालयाला पटवून दिले. त्यामुळे न्यायालयाने बी. एन. एस. एस कायदा 2023 चे कलम 175 (3) प्रमाणे पुढील तपास करण्यासाठी शुभम केकान यांची फिर्याद नोंदवून घेण्याचे आदेश दिले.

करमाळा न्यायालयातील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार करमाळा पोलिसांनी दि.०६/०८/२६ रोजी ज्ञानेश्वर दिनकर ढाकणे (वय-४६ वर्षे), महादेव उत्तम ढाकणे (वय-५२ वर्षे), कल्याण उत्तम ढाकणे (वय-६० वर्षे), जयदत्त श्रीमंत ढाकणे (वय-२७ वर्षे), सुमित मधुकर ढाकणे (वय-३४ वर्षे), दिनकर नामदेव ढाकणे (वय-७० वर्षे), अरुणा मधुकर ढाकणे (वय-४५ वर्षे), उर्मिला श्रीमंत ढाकणे (वय-४६ वर्षे), कुशवार्ता दिनकर ढाकणे (वय-६५वर्षे) आणि वंदना ज्ञानेश्वर ढाकणे (वय-४१ वर्षे) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस) 2023 च्या कलम 103(1), 109(1), 118(1), 118(2), 115(2), 352, 351(2), 351(3),189(2), 189(4), 191(2), 191(3), 190, 127(7) नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे हे या गुन्हयाचा अधिक तपास करत आहेत.
