गोशाळेत बैलपोळा साजरा करत दिला हिरवा चारा
करमाळा, प्रतिनिधी – माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील जीवन सहारा परिवार आणि जैन सोशल ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन व पशुसंवर्धनाचा संदेश देणारे विविध सामाजिक उपक्रम करमाळा तालुक्यातील कुंभारगाव आणि करमाळा शहरात उत्साहात राबविण्यात आले.

कुंभारगाव येथे लोकसहभागातून, गावातील महिला मंडळे तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने तब्बल १७०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. शाळेचा परिसर, रस्त्याच्या दुतर्फा, स्मशानभूमी परिसर तसेच इतर उपलब्ध जागांवर विविध प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणानंतर नव्याने लागवड केलेल्या झाडांना टँकरद्वारे पाणी देऊन त्यांच्या संगोपनाचीही सुरुवात करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

यानंतर करमाळा येथील पांजरपोळ गोरक्षण संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पारंपरिक बैलपोळा सणाचे गोशाळेत विशेष आयोजन करण्यात आले. गोशाळेतील गाईंना सजवून त्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थांच्या वतीने गोशाळेसाठी एक ट्रॅक्टर ट्रॉली भरून हिरवा चारा देण्यात आला. पशुसंवर्धनासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष ठरला.

या सामाजिक उपक्रमांमध्ये अकलूज येथून जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष अमित दोशी तसेच जीवन सहारा परिवारचे पियुष दोशी, सतीश दोशी , अल्पेश दोशी, बाहुबली दोशी, यशराज दोशी, प्रतीक दोशी, अमित दोभाडा, दादा वाघमोडे यांचा सक्रिय सहभाग लाभला. तसेच या उपक्रमासाठी करमाळा गोशाळेचे अध्यक्ष भरतकुमार गांधी, मंगेश गांधी यांनी विशेष सहकार्य केले.

पर्यावरण संवर्धन, वृक्षांचे संगोपन आणि पशुसंवर्धन या तिन्ही क्षेत्रांचा सुंदर समन्वय साधत जीवन सहारा परिवार व जैन सोशल ग्रुप अकलूज यांनी राबविलेल्या या उपक्रमाची करमाळा परिसरात सर्वत्र चर्चा असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

.

.

