करमाळा, प्रतिनिधी – कामगार नेते, करमाळा हमाल पंचायतचे संस्थापक, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या १२व्या स्मृती दिनानिमित्त किर्तन सेवेसह, पुष्पांजली सोहळा, रक्तदान शिबिर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती करमाळा हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी दिली आहे. शहरातील सावंत गल्ली येथील मारुती मंदिराजवळ हे कार्यक्रम पार पडणार आहेत.

कष्टकरी आणि वंचितांचे नेते अशी ओळख असलेल्या स्व. सुभाषआण्णा सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त करमाळा तालुका हमाल पंचायत आणि सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी शुक्रवार दि.१४ ऑगस्ट रोजी स्व. सुभाषआण्णा यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी १० ते दु. १२ या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधन बाल कीर्तनकार छोटे इंदुरीकर ह.भ.प. माऊली काकडे महाराज यांचे हरीकीर्तन होणार आहे.

किर्तनानंतर दुपारी १२ वाजता स्व. सुभाषआण्णा सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी करून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. याबरोबरच सावंत गल्ली येथील हनुमान मंदिरासमोर स्व. सुभाषआण्णा सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत भव्य रक्तदान शिबीराचा सामाजिक उपक्रमही सुरू राहणार आहे.

स्व. सुभाषआण्णा सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात शहर व तालुक्यातील सर्वांनी उपस्थित राहून सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेत रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करमाळा तालुका हमाल पंचायत आणि छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

.

.

.

.

