करमाळा प्रतिनिधी – मनोहर भोसले याच्यावर कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वाढीव कलमान्वये दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दोघांना अटक केल्यानंतर दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा माया रामदास झोळ यांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्यासह अटकेतील दोन आरोपींनाही दि. २१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

याबाबत दिलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे की, मनोहर चंद्रकांत भोसले व त्याच्या इतर साथीदारांवर कुर्डूवाडी आणि करमाळ्यात एकूण 06 गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सदर गुन्ह्यांच्या तपासाकरीता सोलापूर ग्रामीण घटकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. सदर एस.आय.टी पथकाने गुन्हयात सहभाग असणारे एकूण 24 आरोपी निष्पन्न केले आहेत.

या गुन्हयात दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचा मनोहर भोसलेच्या अवैध पैशाची विल्हेवाट लावण्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यात त्यांना मदत करणारे संस्थेमधील आरोपी राजेंद्र गोकुळ हुंबे यास दिनांक 11/08/2026 रोजी व, लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यास दिनांक 13/08/2026 रोजी पोलिसांनी अटक केली होती व त्यांची आज दिनांक 17/08/2026 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर होती. सदर गुन्हयाचा सविस्तर तपास करीत असताना, रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ यांचा देखील सदर गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना दिनांक 16/08/2026 रोजी अटक केली होती.

आज रोजी सदर तिन्ही आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली असता त्यांना दिनांक 21/08/2026 रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सदर गुन्हयातील आरोपी रामदास झोळ हा परागंदा असून त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली असून त्याचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास विशेष तपास पथक करीत आहे.

.

.

