September 4, 2026
IMG-20260817-WA0051

करमाळा, प्रतिनिधी – वांगी नं. २ येथील श्री अवधूत विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापकांच्या कारभाराविरोधात सुरू असलेल्या तक्रारी आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाने प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र बाजीराव वनवे यांना देण्यात आलेले प्रभारी मुख्याध्यापक पदाचे अधिकार रद्द करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी पत्राद्वारे दिली असल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था तसेच वांगी नं. २ येथील ग्रामस्थांच्या वतीने श्री अवधूत विद्यालयाच्या कारभाराबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने संबंधित प्रकरणाची दखल घेतली आहे. कार्यालयाकडून देण्यात आलेल्या पत्रात वनवे यांचे प्रभारी मुख्याध्यापक पदाचे अधिकार रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, संबंधित प्रकरणात महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमांमधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याच्या आरोपांबाबत पुढील आवश्यक कारवाई करण्याची स्पष्ट शिफारस शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुणे यांच्याकडे करण्यात आल्याचेही पत्रात नमूद आहे.

दरम्यान शिक्षण विभागाच्या पत्रानंतर सदर शाळेच्या बाजूला तीन दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!