करमाळा, प्रतिनिधी – पावसाने दडी मारल्याने करमाळा तालुक्यातील खरीप पिकांवर संकट ओढवले असून, पाण्याअभावी पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दोंड यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर बोलताना त्यांनी सांगितले आहे की, करमाळा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने विविध पिकांची पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर काही काळ पाऊस झाल्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळत नाही. परिणामी अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून, उभी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

पावसाअभावी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही धोक्यात आला आहे. ऐन वाढीच्या दिवसांत पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे. आगामी काळातील सणावारांच्या दृष्टीने शेतकरी वर्गाचा विचार करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने शेतशिवारात जाऊन वस्तुनिष्ठ पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत आणि शासनाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी निकडीची मागणी दोंड यांनी केली आहे.

.

.

.

.

