विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न
करमाळा, प्रतिनिधी – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमलाभवानी देवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली.

रविवार दि.११ ऑक्टो. रोजी मंदिर संस्थानचे विश्वस्त ॲड. शिरीषकुमार लोणकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते आणि करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासह संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे तसेच सर्व विश्वस्तांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे पुजारी दादासाहेब पुजारी यांनी देवीची विधिवत पूजा मांडली. घटस्थापनेनंतर सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या गजरात देवीची आरती संपन्न झाली. पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि आई राजा उदो उदो, सदा आनंदीचा उदो उदो!’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

यावेळी पुरोहित रविराज पुराणिक, सुशील पुराणिक, मंदिराचे पुजारी बापूराव पुजारी, विजय पुजारी, संदीप पुजारी (सर), जयदीप पुजारी, भारत सोरटे, नारायण सोरटे, अभिमान सोरटे, रामलिंग सोरटे यांच्यासह मंदिरातील सर्व मानकरी, सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते.

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात धार्मिक विधींची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासोबतच माही डेकोरेशन व मराठा मंदिर डेकोरेशन यांच्या वतीने मंदिर आणि परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याशिवाय मंदिरात आरोग्य शिबिरासह रक्तदान शिबीर, अन्नदान, आराधी मेळा, शाहिरी पोवाडे आदी उपक्रम पार पडणार आहेत.

नवरात्रोत्सवात श्री कमलाभवानी देवीच्या दर्शनासाठी करमाळा शहरासह परिसरातील विविध गावांमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. यानिमित्ताने नवरात्रोत्सवात मंदीरासमोरील ९६ पायऱ्यांच्या बारवे लगत भाविकांच्या मनोरंजनासाठी उंच पाळण्यांसह इतर खेळणी आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत.

