करमाळा, प्रतिनिधी – येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी आदिती जितेंद्र चांदगुडे हिने सोलापूर ग्रामीणचे प्रतिनिधित्व करत सोलापूर विभागस्तरीय मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशामुळे तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र शासन क्रीडा युवक व सेवा संचालनालय (पुणे) अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील वाडिया पार्क प्रांगणात या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहिल्यानगर शहर, अहिल्यानगर ग्रामीण, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, पिंपरी चिंचवड, क्रीडा प्रबोधिनी, मिशन लक्षवेध अशा अनेक ठिकाणांहून स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची खेळाडू कु. आदिती जितेंद्र चांदगुडे हिने विभागस्तरीय मल्लखांब स्पर्धेत सोलापूर ग्रामीणचे प्रतिनिधीत्व करत १९ वर्ष वयोगटामध्ये प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान कायम केले.

या कामगिरीसाठी कु.आदीतीला महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख प्रा. रामकुमार काळे व मल्लखांब कोच सागर शिरस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.ए.पी माने, उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु.आदितीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

.

