कार्यकर्त्यांची गावागावांतून जनजागृती तर नेत्यांकडून राजकीय पातळीवर प्रयत्न
करमाळा, विशाल परदेशी – उजनी साठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांची अवहेलना पाचवीला पुजलेली असल्याचे सुरुवातीपासूनच दिसून येते. आता या अवहेलनेचा कहर म्हणून उजनी वर शासन स्तरावरून विनाशकारी प्रकल्प येऊ घातले आहे. या विनाशकारी प्रकल्पांना वाचा फुटण्यास उशीर झाला असला तरी या प्रकल्पांना उजनीवर थारा न देण्याचा चंग बांधून उतरलेल्या समितीला जनसामान्यांसह राजकीय पुढार्यांचाही साथ लाभत असल्याने हे प्रकल्प उधळून लावण्यासाठी शनिवारी भीमा नगर येथे आयोजित रास्ता रोको आंदोलन लक्षवेधी होणार, हे निश्चित आहे.

दोन वर्षांपूर्वी पासून शासनाकडून उजनी धरण परिसरात जलपर्यटनाला चालना देण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या आराखड्यांची घोषणा केली गेली होती. या आराखड्यांद्वारे उजनी भोवतालचा परिसर बोटिंग, क्रूझ सफारी, पक्षी निरीक्षण, हॉटेलिंग इत्यादीसाठी उपलब्ध करून देऊन परिसरातील लोकांना याद्वारे रोजगाराची संधी मिळवून देणार होता. मात्र या सर्व गोष्टींकडे दिवा स्वप्न म्हणून पाहणाऱ्या आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उभी पिकवणे जगवण्यासाठी धडपडणाऱ्या चिकलठाण परिसरातील काही तरुणांनी उजनी धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या वीज पंपांची वीज कपात करू नये म्हणून निवेदन देण्यासाठी भिमानगर येथील उजनी धरण व्यवस्थापन कार्यालय गाठले होते.

यावेळी उजनी गावासह इंदापूर तालुक्यातील रांजणी येथील काही तरुणांनी उजनीवर विध्वंसक प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती चिकलठाण येथील शेतकऱ्यांना दिली. असे प्रकल्प येण्यापूर्वी शासकीय पातळीवरून शेतकऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना कल्पना देण्यात येईल, मग त्याला विरोध करता येईल, असा विचार ही मंडळी करत असतानाच या प्रकल्पांसाठी शासन गोपनीय रित्या सकारात्मक हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकल्पांच्या उभारणीसाठी उजनी धरण आणि परिसरात मागील अनेक दिवसांपासून ड्रोन द्वारे पाहणी, भूसंपादनाच्या दृष्टीने हालचाली, शासकीय स्तरावर मंजुरी असे प्रकार पूर्वीच झाले असल्याचे समजल्याने शेतीसाठी पाण्याच्या अपेक्षेने भिमानगरला गेलेल्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.

आणि मग पाणी कपातीचा विषय बाजूला राहिला आणि सुरू झाला तो विध्वंसक प्रकल्पांना विरोध करण्यासाठीचा उठाव…! या प्रकल्पांना विरोध करण्याच्या निमित्ताने धरणापुढील इंदापूर तालुक्यातील तसेच टेंभुर्णी परिसरातील गावांसह धरणाच्या अलीकडील करमाळा आणि माढा तालुक्यातील सामान्य शेतकरी एकत्र येऊ लागले. या एकत्रीकरणातून उजनी धरणावरील विनाशकारी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी उजनी धरणग्रस्त शेतकरी, मच्छीमार, वारकरी व नागरिक संवर्धन समितीची स्थापना झाली आणि या समितीद्वारे शनिवार दि.३१ ऑक्टोबर रोजी भीमानगर येथे होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाला उपस्थित राहण्याबाबत करमाळा, माढा, इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्त भागांमध्ये जनजागृती बैठका, कॅन्डल मार्च आदिंद्वारे आवाहन करण्यात येत असून या बैठका आणि मोर्चांना आबाल वृद्धांसह महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

जनतेतून सुरू झालेल्या या उठावाला विविध राजकीय गट, पक्ष, संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी साथ देण्यास सुरुवात केली. या प्रकल्पांना सामान्य जनतेतून विरोध वाढत असतानाच करमाळा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, शेतकरी कामगार संघर्ष सेनेचे दशरथ कांबळे, भाजपा नेते दिग्विजय बागल, शंभूराजे जगताप आदींनीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या जनआंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

ज्याप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी सुरू असलेल्या चळवळींना प्रेरणा देण्यासाठी कविवर्य वसंत बापट यांनी ‘शिंग फुंकिले रणी’ या कवितेतील
“शिंग फुंकिले रणीं, वाजतात चौघडे ।
सज्ज व्हा, उठा उठा, सैन्य चालले पुढे ॥”
या ओळीं द्वारे स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, देशभक्ती आणि देशसेवेसाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा दिली होती, त्याचप्रमाणे उजनी धरणासाठी जमिनीचा त्याग केलेल्या शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी शनिवारी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनासाठी आंदोलक रुपी “सैन्य” सज्ज होताना दिसत आहे.

