आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन; पाच आरोग्य उपकेंद्रांमध्ये कर्मचारी नियुक्तीचीही मागणी
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील केम व परिसरातील ग्रामीण जनतेला दर्जेदार आणि तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून त्याठिकाणी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे करण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. या मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले.

केम व परिसरातील अनेक गावांतील नागरिक आरोग्य सेवांसाठी केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहेत. मात्र, आपत्कालीन परिस्थितीतील रुग्ण, गरोदर माता, लहान बालके तसेच ज्येष्ठ नागरिकांना पुढील उपचारांसाठी करमाळा, सोलापूर किंवा इतर शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. ही अडचण लक्षात घेता केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरू करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय करमाळा तालुक्यातील वडशिवणे, गुळसडी, पोपळज, उमरड आणि सावडी येथील नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने या उपकेंद्रांमधून नागरिकांना अपेक्षित आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या सर्व उपकेंद्रांमध्ये आरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करून ती पूर्ण क्षमतेने सुरू करावीत, अशी मागणीही संदीप तळेकर यांनी केली आहे.

या दोन्ही महत्त्वपूर्ण मागण्यांबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी मागण्यांचा सकारात्मक विचार करून केम येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याच्या प्रस्तावासह अन्य आरोग्यविषयक प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे केम येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत तसेच तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये आवश्यक कर्मचारी नियुक्त होईपर्यंत प्रहार संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी स्पष्ट केले आहे.

