November 7, 2026
IMG-20261107-WA0042(1)

माजी आमदार संजयमामा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती; लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उद्या, रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी घोटी येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सायंकाळी ४ वाजता साडे-घोटी रोडलगत असलेल्या राऊत-पाटील फार्म हाऊस येथे ही बैठक पार पडणार आहे.

दहिगाव उपसा सिंचन योजना ही करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. मात्र, योजनेच्या आवर्तनापासून लाभक्षेत्रातील अनेक गावे वंचित राहत असल्याने शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांत पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळत नसल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या बैठकीत दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाणी आवर्तनाचे योग्य नियोजन, लाभक्षेत्रातील वंचित गावांना पाणीपुरवठा, खरीप व रब्बी हंगामातील पाण्याचे नियोजन आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाकडून आवश्यक कार्यवाही करून घेणे, या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. केवळ चर्चा करण्यापुरती बैठक मर्यादित न ठेवता, पाणीप्रश्नावर ठोस उपाययोजना निश्चित करून त्याच्या अंमलबजावणीसाठी सामूहिक पाठपुरावा करण्याचा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे.


या बैठकीस कुंभेज, देवळाली, खडकेवाडी, गुळसडी, पाडळी, डोह, पांडे, शेलगाव (क.), सौंदे, फिसरे, हिसरे, अर्जुननगर, वरकटणे, कोंढेज, निंभोरे, साडे, घोटी, सालसे, आळसुंदे, वरकुटे, मलवडी आदी गावांतील लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहभागी होऊन आपली भूमिका मांडावी, असे आवाहन बैठकीचे संयोजक तथा घोटीचे सरपंच विलास काका राऊत यांनी केले आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!