केम येथील सभेत भांगे, जाधव, गुटाळ यांचा भाजपात जाहीर प्रवेश
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या केम गट आणि केम व साडे गणातील भाजपा-राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवार दि.२७ रोजी सायंकाळी केम येथील महात्मा गांधी चौकात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत कंदर गावचे माजी सरपंच भास्करराव भांगे, साडे येथील माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय जाधव आणि आदीनाथचे माजी प्रशासकीय संचालक संजय गुटाळ या दिग्गजांसह केम गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल आणि मकाईची माजी चेअरमन दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत आणि गोरख पारखे यांच्या अध्यक्षतेखाली केम गटातून असलेल्या भाजपा उमेदवार मालती संजय देवकर आणि केम गणातून पंचायत समितीसाठी भाजपातून उमेदवार असलेले महावीर भैरू तळेकर आणि साडे गणातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवार असलेले दशरथ भगवान घाडगे या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत डॉ. रोकडे, दत्तात्रय जाधव, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, राणा वाघमारे यांच्यासह केम भागातील अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रलंबित विकास कामे जलद गतीने होण्यासाठी भाजपा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

या सभेला जेष्ठ भाजपा नेते विलासराव घुमरे, मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर, भाजपा तालुकाप्रमुख सचिन पिसाळ यांच्यासह केमचे माजी सरपंच महेश तळेकर यांच्यासह परिसरातील विविध गावचे सरपंच, सोसायटी चेअरमन आणि सदस्य, उमेदवार मालती देवकर, महावीर तळेकर, दशरथ घाडगे, गोरख जगदाळे, करमाळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अतुल फंड, नगरसेवक सचिन घोलप, सचिन गायकवाड, विजय लावंड, अमोल यादव, अनेक राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

