March 1, 2026
IMG-20260212-WA0049

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर महाराज यात्रेनिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक नवनाथ खानट आणि गणेश आबा तळेकर यांनी दिली आहे. मंगळवार दि.१७ ते शुक्रवार दि. २० फेब्रुवारी असे ४ दिवस तालुक्यातील शेतकऱ्यांना या प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

या कृषी प्रदर्शनामध्ये नाविन्यपूर्ण अशा शेती विकासावर आधारित विविध दालने आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खते व बियाणांचे स्टॉल्स, शेती अवजारे, आधुनिक शेती तंत्रज्ञान, कमी खर्चात अधिक उत्पादने, नैसर्गिक व सेंद्रिय शेती, पाणी व मृदा व्यवस्थापन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीड, तण व रोग नियंत्रण औषध कंपन्यांच्या स्टॉल्स सह महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचे देखील स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. यांसह आधुनिक यंत्रसामग्री, स्वयंचलित वाहने, नर्सरी मधील विविध फळ-फुल झाडे व भाजीपाला रोपांची प्रदर्शन व विक्री, महिलांसाठी गृह व अन्नप्रक्रिया उद्योग, बचत गटांचे उपक्रम, हस्तकला, पोषणमूल्य युक्त पदार्थ निर्मिती यांवर विशेष मार्गदर्शन सत्राचेही आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच युवकांसाठी स्टार्टअप संधी, कृषी व्यवसाय मार्गदर्शन, प्रगतशील शेतकरी आणि अधिकारी यांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे, परिसंवाद आदींची पर्वणी या कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना लाभणार आहे.

या चार दिवसीय कृषी प्रदर्शनामध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक बचत गट यांनी सहभाग घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *