करमाळा, प्रतिनिधी – दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या संस्थापकासह इतरांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान दिलेल्या जबाबाच्या कारणावरून संस्थेच्या कर्मचाऱ्यास दमदाटी व मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचे पुतणे हर्षवर्धन नवनाथ झोळ यांच्यासह तिघांवर दौंड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत महेश चर्तुभुज गायकवाड (वय-२८ वर्षे, सध्या रा. दत्तकला कालेज, बॉईज होस्टेल ता. दौंड जि. पुणे, मुळ रा. निलज ता. करमाळा जि. सोलापुर) यांनी दि.२६/०८/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते २०१९ पासून दत्तकला शिक्षण संस्थेवर नोकरीला आहेत. मनोहर भोसले विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात संस्थाचालक रामदास झोळ व सचिवा माया झोळ यांचीही नावे असल्याने दि.१८/०८/२६ रोजी फिर्यादी गायकवाड यांना कुर्डूवाडी पोलिसात जबाब देण्यासाठी बोलवण्यात आले होते व यावेळी त्यांनी जबाब दिला होता.

त्यानंतर दि.२०/०८/२६ रोजी नवनाथ मधुकर झोळ व हर्षवर्धन नवनाथ झोळ यांनी दत्तकला संस्थेवर येऊन गायकवाड यांना ऑफिसच्या जवळील रूमवर बोलावुन घेऊन “तु जर आले गेल्या गाड्यांबाबत तसेच कॉलेज बाबत काही माहिती दिल्यास तुला मारून टाकील” असे म्हणुन गायकवाड यांना या दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. याबाबत गायकवाड यांनी तक्रार दिली नाही.

दरम्यान दि. २४/०८/२६ रोजी गायकवाड यांना पोलिसांनी माढा न्यायालयात बोलावल्यामुळे गायकवाड यांनी माढा न्यायालयात जाऊन जबाब दिला. जबाबा वेळी नवनाथ मधुकर झोळ व हर्षवर्धन नवनाथ झोळ यांनी कॉलेज बाबत बोलल्यास मारहाण केल्याचे गायकवाड यांनी न्यायालयात सांगीतले.

यानंतर दि.२५/०८/२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हर्षवर्धन झोळ यांनी मोबाईल वरून फिर्यादी गायकवाड यांनी विरोधात जबाब दिला तर त्यांच्यासह कुटुंबीयांना बघून घेण्याची धमकी दिली. यानंतर दि.२६/०८/२६ रोजी सकाळी १० च्या सुमारास फिर्यादी गायकवाड हे सोलर चे काम करण्यासाठी माणसे येणार असल्याने संस्थेवर गेले असता हर्षवर्धन झोळ यांनी गायकवाड यांची गचांडी पकडून त्यांच्या गळ्यात दोरी टाकून गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

महेश चर्तुभुज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी हर्षवर्धन नवनाथ झोळ (रा . वाशिंबे,ता. करमाळा) व इतर २ अनोळखी पुरूषांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी हे या गुन्हयाचा अधिक तपास करत आहेत.

.

.

