करमाळा, प्रतिनिधी – श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल, ट्विंकलिंग स्टार्स आणि गिरधरदास देवी विद्यालय येथे रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी श्री कन्हैयालालजी देवी यांच्या वाढदिवसानिमित्त साखळी सूर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन करण्यात आले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सूर्यनमस्कार केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा सुनीता देवी यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी लोकरे सर, नरारे सर, मुथा मॅडम यांच्यासह प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर, मुख्याध्यापक गोरख जगताप उपस्थित होते.

शरीर आणि मन निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी सूर्यनमस्काराचे विशेष महत्त्व असून, सर्वांगाला व्यायाम देणारा परिपूर्ण व्यायाम म्हणून सूर्यनमस्काराकडे पाहिले जाते. याच उद्देशाने आयोजित या उपक्रमात दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते शाळेचे क्रीडाशिक्षक नवनाथ बोळगे सर. त्यांनी तब्बल ७०० सूर्यनमस्कार पूर्ण करून उल्लेखनीय विक्रम केला. विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सूर्यनमस्कार करून या यज्ञात सहभाग नोंदवला.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारा हा सूर्यनमस्कार यज्ञ उत्साहात संपन्न झाला.
.

.

.

