September 11, 2026
IMG-20260910-WA0052

काम झाल्यानंतरचा राडारोडा व इतर कचरा पडून राहिल्याने शाळेच्या आवाराचा उकिरडा

करमाळा, प्रतिनिधी – रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असताना माती मिश्रित काँक्रीटचा वापर केला जात असल्याचा आरोप झाल्यानंतर ठेकेदाराने उर्वरित काम घाई गडबडीत पूर्ण केले असले तरी सुरुवातीला झालेल्या काँक्रीट रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेल्याने हे काम निकृष्ट झाल्याचा प्रत्यय महिनाभरातच येऊ लागला आहे. यासोबतच ठेकेदाराने कॉंक्रिटीकरणाचे साहित्य आणि रिकाम्या गोण्या जागेवरच ठेवल्याने शाळेच्या मैदानाला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

करमाळा शहरातील नगरपालिका हद्दीतील महात्मा फुले पुतळा ते जुने विश्रामगृह दरम्यान सुमारे १ कोटी २४ लाख रुपये खर्चाच्या रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. कार्यारंभ आदेशानंतर बारा महिन्यांत पूर्ण करण्याची अट घालण्यात आली असली तरी या कालावधीत हे काम पूर्ण होणे तर दूरच, पण बारा महिन्यांपर्यंत या कामाची सुरुवात ही झालेली नव्हती. ऐन पावसाळ्याच्या आणि आषाढी एकादशीच्या तोंडावर हे काम सुरू झाले होते. १५ ऑगस्ट च्या तोंडावर या रस्त्याची डावी बाजू अर्ध्यापर्यंत पूर्ण करण्यात आली होती. माती मिश्रित काँक्रीटचा वापर सुरू असल्याचा आरोप झाल्यानंतर ठेकेदाराने उजव्या बाजूच्या कामात सुधारणा केली व ठरलेल्या अंतराच्या मध्यापर्यंत कॉंक्रिटीकरण पूर्ण केले आहे.

मात्र या रस्त्याचे काम होऊन अवघा महिना सुद्धा लोटला नसताना पूर्वी झालेल्या डाव्या बाजूच्या रस्त्याला ठिकठिकाणी आडवे आणि उभे तडे गेलेले दिसून येत आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असल्याने एस टी बसेस, जड वाहने आणि ऊसाच्या ट्रॅक्टरची वाहतूक याच मार्गाने होते. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रस्त्याला तडे जात असल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होत आहे.

याशिवाय हे काम करत असताना संबंधित ठेकेदाराने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेच्या मैदानाचा खडी, क्रश सॅंड साठवण्यासाठी आणि काँक्रीट तयार करण्यासाठी वापर केला होता. सध्या नियोजित अंतरापर्यंत काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित अंतरावर डांबरीकरण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम उप विभागाकडून सांगण्यात आले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत डांबरीकरण शक्य नसल्याने या मैदानात भल्या मोठ्या प्रमाणात खडी आणि क्रश सॅंडचा साठा अद्यापही पडून आहे. याशिवाय कॉंक्रिटीकरणा दरम्यान शाळेच्या प्रवेशद्वारासमोर काँक्रीट मिक्सर मधून सांडलेला राडारोडा आणि रिकाम्या सिमेंटच्या गोण्या पडून असल्याने शाळेच्या परिसराला उकिरडा सदृश्य स्वरूप प्राप्त झाले आहे.

वरील सर्व तक्रारींसंदर्भात सा. बां. करमाळा उपविभागाचे उप अभियंता ए.डी. पवार तसेच सहा. उप अभियंता खटाटे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल घेतला नाही.

रस्ता मजबुतीकरणाच्या कामाच्या या संपूर्ण कारभाराची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दक्षता व गुणवत्ता नियंत्रण पथकाकडून तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!