सातोली येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
करमाळा, प्रतिनिधी – गावातील ओढ्यात शेळ्या चारणाऱ्यांना शेळ्या चारण्यास अटकाव करून जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तसेच सोबत असलेल्या युवकाला पट्ट्याने मारल्याप्रकरणी तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा तालुक्यातील सातोली येथे दि.१०/०६/२६ रोजी ही घटना घडली आहे.

याबाबत संगिता संपत पवार या 40 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या दि.१०/०६/२६ रोजी दुपारी गावातील ओढ्याच्या काठावर नातेवाईकांसह शेळ्या चारत होत्या. यावेळी लहु साहेबराव साळुंखे, उत्तरेश्वर लहुजी साळुंखे व सुहास साहेबराव साळुंखे (सर्व रा. सातोली ता. करमाळा) हे तिघे तिथे आले व फिर्यादीला ‘तुम्ही येथे शेळ्या का आणल्या’ असे म्हणुन फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळी करुन हाताने लाथाबुक्याने मारहाण करुन तसेच फिर्यादीच्या सोबत असलेल्या बबलु राक्या उर्फ बारक्या काळे या नातेवाईकास इंजिनच्या पट्याने मारहाण करुन जखमी केले.

संगिता संपत पवार यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी लहु साहेबराव साळुंखे, उत्तरेश्वर लहुजी साळुंखे व सुहास साहेबराव साळुंखे या तिघांविरुद्ध बी.एन.एस कलम 118(1),115(2), 351(2),352,3 (5) व अ.जा.अ.ज. प्रतिबंधक कायदा कलम 3(1) (r), 3(1) (s), 3(2)(va) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

.

