June 11, 2026
IMG-20260611-WA0011

तालुक्यातील समाज बांधवांसह जनजागृतीपर बैठक

करमाळा, प्रतिनिधी – भटके विमुक्त समाजाच्या घरांची गणना व जनगणना तसेच संविधानाने दिलेले हक्क व अधिकारांबाबत यांची जाणीव करण्यासाठी ॲड.डॉ.अरूण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखालील मुशाफिरी यात्रेचे गुरुवारी करमाळा येथे आगमन झाले. यावेळी भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रामकृष्ण माने व नटवरलाल काळे यांच्या नियोजनात व करमाळा येथील कैकाडी, मदारी, पारधी समाजाच्या उपस्थितीत एकलव्य आश्रम शाळेच्या प्रांगणात जनजागृतीपर बैठक पार पडली.

ॲड.डॉ.अरूण जाधव यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा येथील मदारी समाजाच्या वस्तीतून या मुशाफिरी यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा पुणे जिल्ह्यातून गुरुवारी सोलापूर जिल्ह्यात आली. यावेळी करमाळा तालुक्यातील कैकाडी, मदारी, पारधी समाजाच्या वस्त्यांवर मार्गदर्शन करताना ॲड.डॉ.अरूण जाधव म्हणाले की, देश डिजीटल बनण्याचे स्वप्न पाहत असताना भटके विमुक्त समाज अजूनही स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भटकंती करत आहे. या समाजाची खूप दयनीय अवस्था आहे. एकीकडे कुंभमेळ्यासाठी करोडो रुपयांचे बजेट तयार केले जाते परंतु जो समाज हजारो वर्षांपासून जीवन जगण्यासाठी संघर्ष करीत आहे, त्यांच्यासाठी कोणतेही बजेट नसते, हे या नाकर्ते सरकारचे अपयश आहे. देशात सध्या घरगणना व जनगणना चालू आहे. यात घराला दरवाजा, खिडकी असलेल्याच घराची नोंद केली जात आहे. देशात पशु, पक्ष्यांची गणना केली जाते, परंतु दार आणि खिडकी नसलेल्या पालांची व त्यात राहणाऱ्या समाज बांधवांची नोंद होत नाही. त्यामुळे भविष्यात भटके विमुक्त समाजाला नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

घर व जनगणने सोबतच भटके विमुक्त समाज शिक्षण, आरोग्य, घर, लाईट आणि विविध शासकीय कागदपत्रांपासूनही वंचित आहे. त्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे भटके विमुक्त समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही मुशाफिरी यात्रा काढण्यात आल्याचे ॲड. डॉ. जाधव यांनी सांगितले.

यावेळी मुशाफिरी यात्रेचे राज्य समन्वयक संतोष चव्हाण,बिलाल सय्यद मदारी, मंगलाबाई पवार, भालचंद्र काळे यांचीही भाषणे झाली. या बैठकीला ऋषी गायकवाड, जाकीर तांबोळी, विशाल लोंढे, सुभाष ओहोळ, मेहमूद मदारी यांच्यासह कैकाडी, मदारी, पारधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष चव्हाण यांनी केले तर आभार प्रा.तुकाराम शिंदे यांनी मानले.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!