अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार
करमाळा, प्रतिनिधी – गेल्या आठ दिवसांपासून करंजे परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी करमाळा शहरातील महावितरणच्या उप अभियंता कार्यालयासमोर खर्डा भाकरीचा नैवेद्य ठेवून कार्यालयासमोरच खर्डा भाकरी खात ठिय्या आंदोलन केले. जवळपास दोन तास चाललेल्या या आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी हे आंदोलन स्थगित केले.

सोमवार दि. २० रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास करंजे परिसरातील शेतकऱ्यांनी करमाळा शहरातील महावितरण कार्यालयासमोर खर्डा भाकरीचा नैवेद्य ठेवला आणि घरून बांधून आणलेल्या शिदोऱ्या सोडून खर्डा भाकरी खात आणि महावितरणच्या कारभाराविरुद्ध घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. यावेळी महावितरणचे उप अभियंता आशिष कलावते यांनी आंदोलक कार्यालयात मागणी घेऊन आलेच नसल्याचे सांगितले तर यापूर्वी केलेला पाठपुरावा लक्षात आणून देत आंदोलकांनी कार्यालयात येऊन चर्चा करण्यास नकार दिला. दरम्यान उप अभियंता कलावते यांनी करंजे भागाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना पाचारण करत वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

या चर्चेनंतर त्यांनी कार्यालयाबाहेर येऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व आवश्यक ती कार्यवाही करून दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे तोंडी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलकांनी तूर्तास माघार घेत कार्यालयासमोर सुरू ठेवलेले ठिय्या आंदोलन स्थगित केले, मात्र लवकरच वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर सीना नदीत जलसमाधी आंदोलन घेणार असल्याचे निवेदन देत हे आंदोलन स्थगित केले.

यावेळी करंजे ग्रामपंचायत सदस्य शहाजी ठोसर, माजी उपसरपंच गणेश वैद्य, आदिनाथचे संचालक किरण फुके, ज्योतीराम सरडे, सुनील साबळे, नारायण गाडगे, नितीन ठोसर, गौतम पोळके, विजय वैद्य, तानाजी सरडे, अरविंद सरडे, तुषार सरडे, बाळा पाटील, दादा पाटील, कांतीलाल पाटील, अमोल थोरात, अण्णा फुके, बाबासाहेब ठोसर, बबन सरडे, अशोक पवळ, नितीन ठोसर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

.

.

