करमाळा, प्रतिनिधी – आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्यांच्या वाढत्या वर्दळीच्या पार्श्वभूमीवर करमाळा नगर पालिकेतर्फे वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी युद्धपातळीवर नियोजन सुरू करण्यात आले आहे. यासाठी शुक्रवार, १० जुलै रोजी नगराध्यक्षा मोहिनी संजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपनगराध्यक्ष अतुल फंड यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बैठकीस सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. शहरातून मोठ्या संख्येने दिंड्या मार्गस्थ होत असून काही दिंड्यांचा मुक्काम करमाळ्यात असतो. त्यामुळे वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी यावेळी दिली.

या बैठकीत समाज मंदिरे, धार्मिक स्थळे व सार्वजनिक सभागृहे निवासासाठी उपलब्ध करून देणे, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, तसेच मुबलक पाणीपुरवठा सुनिश्चित करणे यांसह विविध उपाययोजनांवर बैठकीत चर्चा होणार आहे. प्रभागातील समस्या व वारकऱ्यांच्या गरजा थेट प्रशासना पर्यंत पोहोचवण्यासाठी नगरसेवकही सक्रिय सहभाग घेणार आहेत.

नगराध्यक्षा मोहिनी सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड आणि सर्व नगरसेवकांच्या पुढाकारामुळे यंदाची वारी अधिक सुकर व सुविधायुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

.

.

.

.

