करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील गौंडरे येथील श्री शिवछत्रपती बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. हेडगेवार माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गौतम विष्णू सांगडे व सहशिक्षक दिलीप रणमोडे यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवापूर्ती निमित्त गौंडरे फाटा येथील साई वैभव मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण व भावपूर्ण सत्कार सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमास माजी शिक्षक आमदार तथा शिक्षक नेते प्रा. दत्तात्रय सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेशराव करे-पाटील होते. या कार्यक्रमाला गौंडरे पंचक्रोशीतील नागरिक, विविध शाळांतील शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक तसेच सामाजिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

सांगडे व रणमोडे यांनी सुमारे २९ वर्षांच्या सेवाकाळात विद्यालयाच्या शैक्षणिक, क्रीडा व भौतिक प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिष्यवृत्ती, नवोदय प्रवेश परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. आधुनिक शिक्षणपद्धती, तंत्रज्ञानाधारित अध्यापन व विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीतही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.

यावेळी करमाळा तालुक्याच्या वतीने व यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेकडून दोन्ही शिक्षकांना मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. डॉ. करे-पाटील यांनी त्यांच्या प्रामाणिक, विद्यार्थिनिष्ठ व समाजाभिमुख कार्याचा गौरव केला. “शिक्षक निवृत्त होतो; परंतु त्याने विद्यार्थ्यांच्या मनात रुजवलेले संस्कार व ज्ञान कधीच निवृत्त होत नाही,” अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक व ग्रामस्थांनी आपल्या आठवणींना उजाळा देत दोन्ही शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

संस्थेचे अध्यक्ष अरविंद श्रीरंग रणमोडे, उपाध्यक्ष दत्तात्रय अजिनाथ कापले, सचिव दिनकर विष्णू सांगडे, संचालक महादेव भागवत गायकवाड, पोपट अजिनाथ कापले, अर्जुन शंकर ननवरे, रामकृष्ण बाबुराव खंडागळे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दोन्ही शिक्षकांना निरोगी, आनंदी व समाजोपयोगी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

.

.

.

