करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या तथाकथित विक्री अथवा भाडेपट्ट्याच्या करारांबाबत सभासदांना विचारात घेण्यासाठी तसेच कारखान्याच्या देण्यासंबंधी खुलासा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते उदयसिंह देशमुख यांनी सुरू केलेले आमरण उपोषण शनिवारी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सूचनेवरून स्थगित करण्यात आले. उपोषणाच्या पाचव्या दिवशीही संचालक मंडळाने कोणतीही लेखी प्रतिक्रिया न दिल्याने तसेच देशमुख यांची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाल्याने आत्मक्लेषापेक्षा वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करण्याची खासदार शेट्टी यांनी सूचना केल्यामुळे देशमुख यांनी मागील चार दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण तसेच शनिवारी कारखान्याच्या गेट समोर केलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

आदिनाथ वाचवण्यासाठी उदयसिंह देशमुख यांनी कारखान्याच्या गेटवर मंगळवार दि. ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या चार दिवसांनंतर उपोषणाच्या पाचव्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी ११ वाजता कारखान्याच्या गेट समोर रास्ता रोको करण्यात येणार होता. यासाठी शनिवारी मोठ्या संख्येने सभासद कारखान्याच्या गेटवर उपस्थित झाले होते.

ठरल्याप्रमाणे शनिवारी अकरा वाजता उपोषण कर्ते देशमुख यांच्यासह इतर सभासदांनी करमाळा टेंभुर्णी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पोलिसांनी दबाव तंत्राचा वापर केल्याचा आरोप देशमुख यांच्यासह आंदोलकांनी केला.

यानंतर जेष्ठ नेते शहाजी देशमुख यांच्यासह अनेकांनी कारखाना प्रशासन व देशमुख यांच्यात संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारखान्याच्या विक्री किंवा भाडे तत्त्वावर देण्यासंदर्भात कोणताही ठोस निर्णय अद्याप झाला नसल्याचे सांगत संचालक मंडळ कोणतेही लेखी आश्वासन देण्यास तयार नसल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक सर्जेराव राऊत यांनी सांगितले. त्यामुळे उदयसिंह देशमुख यांनी पुन्हा आंदोलन स्थळी बसून उपोषण सुरू ठेवले.

दरम्यान आदिनाथ सहकारी साखर कारखान्या संदर्भात शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या संपर्कात असलेल्या उदयसिंह देशमुख यांनी उपोषणाच्या पाचव्या दिवसापर्यंतची सर्व परिस्थिती मोबाईल कॉल वर सांगितली. देशमुख यांचे ऐकून घेतल्यानंतर शेट्टी यांनी देशमुख यांना सुरू असलेले उपोषण थांबवण्याची सूचना करून आगामी काळात सर्व सभासदांना घेऊन मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्याचे सांगितले.

शेवटी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सूचनेचा आदर करत देशमुख यांनी उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले. यानंतर ज्येष्ठ नेते शहाजी देशमुख, कारखान्याचे जेष्ठ सभासद बापूसाहेब पोटे, अरुण शेंडगे, रोहिदास सातव तसेच पोलीस निरीक्षक रणजीत माने, आदिनाथ चे कार्यकारी संचालक सर्जेराव राऊत आदींच्या हस्ते सरबत घेऊन तसेच आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आणि सहभाग घेणाऱ्या सभासदांचे आभार मानत देशमुख यांनी उपोषण स्थगित केले.

.

.

