करमाळा, प्रतिनिधी – सध्या भारत निवडणूक आयोगाची SIR-2026 (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन 2026) ही प्रक्रिया सुरू आहे. मतदार याद्यांचे विशेष पुनरावलोकन व पडताळणी करण्यासाठीची सरकारची ही विशेष मोहीम सुरू असताना मुंबईतील एका मतदाराला भारतीय निवडणूक आयोगाच्या नावाने व्हॉट्सॲपवर बनावट आणि दिशाभूल करणारा संदेश प्राप्त झाल्याची बाब समोर आल्यानंतर करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी अशा संदेशांना प्रतिसाद न देण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत मुंबई येथील नागरिकाला आलेल्या फेक मेसेजचा स्क्रीन शॉट सार्वत्रिक करत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगितले आहे की, एस आय आर प्रक्रियेचा उद्देश पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट राहावीत आणि अपात्र, मृत, स्थलांतरित किंवा दुबार नोंदी वगळल्या जाव्यात हा आहे. या प्रक्रियेत बूथस्तरीय अधिकारी (BLO) घरभेटी घेऊन माहितीची पडताळणी करतात व आवश्यकतेनुसार अर्ज व कागदपत्रे स्वीकारतात. त्यामुळे मतदारांनी केवळ निवडणूक आयोगाच्या अधिकृत सूचना व माध्यमांवरच विश्वास ठेवावा आणि कोणतीही शंका असल्यास आपल्या BLO किंवा संबंधित निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. मुंबईतील एका मतदाराला भारतीय निवडणूक आयोगाच्या नावाने व्हॉट्सॲपवर बनावट आणि दिशाभूल करणारा संदेश प्राप्त झाला आहे. या संदेशात मतदार यादीतील नोंदींमध्ये त्रुटी असल्याचा दावा करून काही कागदपत्रे सादर न केल्यास मतदार ओळखपत्र रद्द करण्यात येईल, अशी भीती निर्माण करण्यात आली आहे. तसेच एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक देऊन तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजला बळी न पडण्याची सावधगिरीची सूचना तहसीलदार ठोकडे यांनी केली आहे.
.
.
.
.
.