अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल
करमाळा, प्रतिनिधी – करमाळ्यात प्रतिबंधित इंजेक्शन्स सह आरोपी ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे अहिल्यानगर सोलापूर मार्गावर करमाळ्या नजीक असलेल्या मांगी गावा लगत मद्य वाहतूक करणारी स्कॉर्पिओ गाडी पलटली आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी चालकाने मात्र गाडी आणि मद्याचे बॉक्स तसेच ठेवून घटनास्थळावरून पोबारा केला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी स्कार्पिओ क्रमांक एम एच ४५ ए क्यू ८९९७ ही चारचाकी करमाळ्याकडून अहिल्यानगरच्या दिशेने भरधाव निघाली होती. यावेळी ही चार चाकी मांगी तलावाच्या डाव्या कॅनॉल लगत उजव्या बाजूला असलेल्या महावितरणाच्या पोलला धडकून देवानंद बागल यांच्या शेतासमोरील खड्ड्यात जाऊन पलटली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी सदर चार चाकी गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात मद्याच्या बाटल्यांचे बॉक्स असल्याने चालकाने वाहन आणि माल जाग्यावर सोडून पलायन केले. या धडकेत महावितरणचा पोल तुटून त्यावरील वीजवाहक तारा महामार्गावर पडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. मात्र महावितरणचे वायरमन संभाजी अंधारे, शरद झिंजाडे, राजू काकडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा खंडित करून महामार्गावरील तारा बाजूला केल्या आणि वाहतूक सुरळीत केली.

तसेच करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे, पो.कॉ. दीपक घोरपडे, किरण पवार, रविराज गटकळ यांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील कार्यवाही सुरु केली.

याबाबत पो.कॉ. सचिन कांबळे यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली असून करमाळा पोलिसांनी घटनास्थळावरून रॉयल इम्पॅक्ट कंपनीच्या ९,६६० रु. किंमतीच्या ७५० मिलीच्या एकूण ६९ दारूच्या बाटल्या आणि ७,००,००० रु. किमतीची चार चाकी असा एकूण ७,०९,६६० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बीट अंमलदार दीपक घोरपडे हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

.

.

.

