गावकऱ्यांनी काढली घोड्यावरून मिरवणूक
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील पांडे गावचे सुपुत्र अभिजीत राऊत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशानंतर पांडे गावासह परिसरातील ग्रामस्थांनी त्यांची घोड्यावरून वाजतगाजत मिरवणूक काढली.
अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिजीत राऊत यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या वडिलांनी शेतीमध्ये मोलमजुरी करून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. या कष्टमय प्रवासातूनच त्यांनी यशाची उंच भरारी घेतली. अभिजीत यांचे प्राथमिक शिक्षण पांडे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात पूर्ण झाले. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेत यशाकडे वाटचाल केली. या यशामध्ये त्यांच्या शेतकरी आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याने गावकऱ्यांनी त्यांचा विशेष सन्मान केला. गावातून अभिजीत राऊत व त्यांच्या आई-वडिलांची मिरवणूक काढण्यात आली तसेच ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. जिद्द आणि चिकाटी असेल तर यश हमखास मिळते. युवकांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने अभ्यास केल्यास कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. आई-वडिलांच्या आशीर्वादामुळेच मी हे यश मिळवू शकलो. -अभिजीत राऊत, नूतन पोलिस उपनिरीक्षक.
अभिजीत राऊत यांच्या यशामुळे परिसरातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
.