September 4, 2026
IMG-20260814-WA0060

करमाळा, विशाल परदेशी – तालुक्यातील वांगी नं.१ येथे विहिरीत पडून माय लेकराचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वांगी नंबर एक येथील लोकविकास डेअरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जाधव वस्ती येथे ही घटना घडली आहे. सौ. शिल्पा सागर जाधव (वय-२८ वर्षे) आणि ऋता सागर जाधव (वय-०२ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शिल्पा यांचे पती सागर जाधव यांचे मोबाईलचे दुकान असून शुक्रवारी सकाळी ते टेंभुर्णी येथे औषधे आणण्यासाठी गेले होते. यावेळी शिल्पा यांच्या सासू शेतात कामावर गेल्या होत्या तर सासरे खंडेराव जाधव हे पक्षाघाताने आजारी असल्याने घरीच पडून असतात.

दुपारी दीडच्या सुमारास घरातील इतर सदस्य जेवणासाठी आल्यानंतर शिल्पा आणि ऋता दिसून न आल्याने त्यांनी घराच्या आसपास शोध घेतला. यावेळी चिमुकल्या ऋताची चप्पल विहिरीत तरंगताना दिसून आल्याने गावातील युवकांच्या मदतीने विहिरीत शोध घेण्यात आला. विहिरीत पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याने तीन विद्युत मोटारी लावून पाणी उपसण्यात आले. यानंतर काही युवकांनी विहिरीत बुडी घेऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ऋताचा मृतदेह आढळला. यानंतर आणखी शोध घेतला असता काही वेळाने शिल्पा यांचा मृतदेह ही मिळून आला.

या घटनेची माहिती कळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील कार्यवाहीनंतर मायलेकीचे मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत याबाबतची कार्यवाही सुरू होती.

चिमुकली ऋता ही खेळत असताना घराच्या जवळ असलेल्या विहिरीत पडल्याने तिला वाचवण्यासाठी शिल्पा यांनीही विहिरीत उडी घेतली. मात्र शिल्पा यांना पोहता येत नसल्याने दोघीही विहिरीत बुडाल्या.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!