September 4, 2026
IMG-20260813-WA0061

करमाळा, प्रतिनिधी – महावितरणच्या तुटलेल्या तारेला स्पर्श होऊन करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील विजय वसंत क्षीरसागर (वय-६०, राहणार – गुळसडी) या शेत मजुराचा विजेच्या जबरदस्त धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे.

गुरुवार दिनांक 13 रोजी विजय क्षीरसागर हे गावातील हनुमंत उद्धव पाटील यांच्या गुळसडी ते पांडे रस्त्यावरील ऊसाच्या शेतात फवारणी करत होते. यावेळी दुपारी दोन ते सव्वादोन च्या सुमारास शेतात तुटून पडलेल्या महावितरणच्या उघड्या तारेचा त्यांच्या पायांना स्पर्श झाला आणि विजेच्या जबर धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

विजय क्षीरसागर यांच्या निधनाचे वृत्त कळताच गुळसडी येथील युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर महावितरणला तसेच करमाळा पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. घटनेनंतर महावितरणाच्या वायरमन यांनी सदर ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला असून करमाळा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सुमारे आठ ते दहा दिवसांपासून तुटलेल्या तारेची माहिती देऊनही महावितरणच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी याबाबत दखल घेतली नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सदर प्रकाराचा योग्य तो तपास होऊन क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!