करमाळ्यात अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे निवेदन
करमाळा, प्रतिनिधी – पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथे चार वर्षीय निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा करमाळ्यात तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. याबाबत मंगळवार दि.५ रोजी करमाळा शहर व तालुका अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने करमाळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजी-आजोबांकडे आलेल्या अवघ्या चार वर्षांच्या निरागस बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी ६५ वर्षीय संशयितास पोलिसांनी अटक केली असून भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशा अमानुष व निंदनीय घटनांना आळा बसावा यासाठी आरोपी विरोधात कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सदर घटनेतील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, करमाळा शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.

यासोबतच पीडितेच्या कुटुंबीयांना शासनाकडून मानसिक आधार व संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी करमाळा शहर व तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. हे निवेदन देतेवेळी महीलांची लक्षणीय उपस्थिती होती.

.

.

