May 28, 2026
IMG-20260526-WA0012

शासनाकडून मदतीची अपेक्षा

करमाळा, प्रतिनिधी – सोमवारी दुपारी ४:३० च्या दरम्यान आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तालुक्यातील जातेगाव येथील कष्टकरी शेतकरी कुटुंबाच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने या कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. राजेंद्र विश्वास गाढवे असे सदर घराच्या कुटुंब प्रमुखाचे नाव आहे.

राजेंद्र गाढवे हे आपल्या जेमतेम असलेल्या शेतीत पत्नी आणि मुलासह राबून उत्पन्न घेतात. आपले पक्के घर असावे या हेतूने या उत्पन्नातून या कुटुंबातील सदस्यांनी काही रक्कम जमवून शेतात नुकतेच दोन खोल्यांचे घर बांधले होते. पुरेशा बचती अभावी घराचे काही काम बाकी असले तरी राहण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने गाढवे कुटुंब काम अपूर्ण असलेल्या घरातच राहत होते.

दरम्यान सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे गाढवे यांच्या घरावरील सर्वच पत्रे लोखंडी पाईप आणि चॅनल सह उडाले. त्यामुळे घराच्या भिंतीही उचकटल्या. याशिवाय घरात ठेवलेली ज्वारी, कपडे आणि इतर संसारोपयोगी वस्तू भिजून गाढवे कुटुंबाचे भरपूर नुकसान झाले आहे.

या घटनेबाबत माहिती मिळताच जातेगावचे ग्राम महसूल अधिकारी निलेश मुरकुटे यांनी मंगळवारी सकाळी जातेगाव येथील गाढवे यांच्या राहत्या घराला भेट देऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे गाढवे कुटुंबावर ओढावलेले संकट लक्षात घेऊन शासनाने त्यांना लवकरात लवकर योग्य ती भरपाई देण्याची मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष अमोल घुमरे यांच्यासह जातेगाव ग्रामस्थांनी केली आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!