May 28, 2026
IMG-20260424-WA0019

आरोपींमध्ये नाथबाबा आणि ड्रायव्हरचा समावेश

करमाळा, प्रतिनिधी – फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांत मनोहर भोसले आणि त्याचे साथीदारांवर पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी असा तळ्यात-मळ्यातचा खेळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. दाखल गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यातील चार दिवसांची पोलीस कोठडी भोगल्यानंतर सोमवारी करमाळा न्यायालयाने या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर आता मनोहर भोसलेवर करमाळ्यात बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत तीस वर्षीय पीडीतेने दि.२५/०५/२६ रोजी करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जानेवारी २०२५ मध्ये पिडीतेची आर्थिक परीस्थिती बिकट असल्याने तिच्या मैत्रीणीने ही परीस्थिती बदलण्यासाठी वडाचीवाडी ता. हवेली जि. पुणे येथे मनोहर मामाला जाऊन भेटण्यास सांगितले. यानंतर पिडीतेने तेथे चार अमावस्या वारी केली. चौथ्या अमावस्येला मनोहर मामाच्या नाथबाबा या सेवकाने पिडीतेला पुढच्या अमावस्येला करमाळा तालुक्यातील घोटी येथे मोठी पुजा करावयाची असल्याचे सांगितले.

त्यानुसार दि.२८/०५/२०२५ रोजी पिडीता, नाथबाबा व ड्रायव्हर असे तिघेजण पांढऱ्या रंगाच्या गाडीतून घोटी येथील मठात पोहचले. यानंतर पिडीतेला मठातील एका रूममध्ये बसवण्यात आले. त्यावेळी पीडितेने नाथबाबाकडे ११,०००/- रूपये दिल्यानंतर काहीवेळाने त्या रूममध्ये मनोहरमामा आला व ‘आपण आता पूजा करू’ असे म्हणून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडीतेने ‘मला कोणतीही पुजा करावयाची नाही’ असे म्हणुन तिला जाऊ देण्याची विनंती केली मात्र तरीही मनोहरमामाने काहीतरी मंत्रोच्चार करत तिच्या इच्छेविरूध्द जबरदस्तीने शारीरीक संबंध केले.

पीडितेच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी मनोहर मामा, नाथबाबा आणि एका अनोळखी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहीता २०२३ आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळा जादू नियम २०१३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पो.स.इ. ज्ञानेश्वर दळवी हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

स्वतःला आध्यात्मिक गुरू आणि बाळूमामांचा अवतार म्हणवून घेणारा स्वयंघोषित भोंदूबाबा ‘मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा’ याच्यावर सप्टेंबर २०२१ मध्येही एका महिला भक्ताच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन बलात्कार केल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!