करमाळा, प्रतिनिधी – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयानुसार घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्यासाठी प्रशासनाने बिटरगाव (श्री) येथील नदीपात्रातील गट निश्चित केला होता. मात्र निश्चित ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नसल्याने तसेच दुसऱ्या ठिकाणाहून आणि मार्गावरून वाळूने भरलेल्या ट्रॉल्या नेण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे मोफत वाळू वाटपाचा कार्यक्रम घरकुल लाभार्थ्यांसाठी मृगजळ ठरला.
त्याचे झाले असे की शासन निर्णयानुसार घरकुल लाभार्थ्यांना तालुक्यातील बिटरगाव (श्री) येथील सीना नदी पात्रातून प्रत्येकी दोन ब्रास वाळू देण्यात येणार असल्याचे संबंधित लाभार्थ्यांना महसूल प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. त्यामुळे जवळपास ५० लाभार्थी वाहने व जेसीबी घेऊन नदी पात्रात मंगळवारी सकाळीच हजर झाले होते. मात्र वाळू देण्याच्या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच नसल्याने हे लाभार्थी दुपारी एक वाजेपर्यंत बिटरगाव येथील स्मशानभूमी नजीकच्या नदीपात्रात अन्न पाण्यावाचून ताटकळत थांबले होते.
दरम्यान ही बाब तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी बिटरगाव येथील काही शेतकऱ्यांना विनंती करून त्यांच्या शेताच्या बाजूने वाहने जाऊ देण्याबाबत विनंती केली. मात्र या मार्गाने भरलेली वाहने परत जाणे शक्य नसल्याचे सांगत या शेतकऱ्यांनी केवळ रिकामी वाहने नदीपात्रात घेऊन जाण्यासाठी संमती दिली. नदीपात्रातून वाळू भरल्यानंतर बाळेवाडी मार्गाने ही वाहने बाहेर निघणे शक्य असल्याने तहसीलदार ठोकडे स्वतः या ठिकाणी लाभार्थ्यांना वाळू देण्यासाठी हजर झाल्या.
मात्र बाळेवाडीतून वाळू भरलेली वाहने काढली जाणार असल्याचे समजताच बाळेवाडी ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र आले व आदेशात नमूद केलेल्या गटातूनच वाळू उपसा करावा, तसेच बाळेवाडी मार्गाने वाहने नेत असताना स्थानिक शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे नुकसान होईल अशी भूमिका घेत त्यांनी प्रशासनाला जोरदार विरोध दर्शविला.
बराच वेळ चाललेला हा संघर्ष घरकुल लाभार्थी बराच वेळ याचकाच्या भूमिकेतून पाहत होते. मात्र वाळू भरलेली वाहने बाळेवाडी लगतच्या गायरानातून नेणार असल्याचे सांगूनही बाळेवाडी ग्रामस्थांनी आपला विरोध कायम ठेवत आक्रमक भूमिका घेतली.
या संघर्षात सायंकाळचे पाच वाजले. दरम्यानच्या काळात लाभार्थ्यांना वाळू नेण्यासंबंधी कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आज (बुधवारी) बिटरगाव लगतच्या दुसऱ्या ठिकाणाहून आणि मार्गावरून वाळू दिली जाईल असे लाभार्थ्यांना सांगितले. त्यामुळे घरकुलासाठी मोफत वाळूच्या मृगजळा मागे दिवसभर पळालेले लाभार्थी मंगळवारी सायंकाळी रीत्या ट्रॉल्या आणि वाहतूक खर्चाच्या नाहक भुर्दंडासह रिकाम्या हाताने परतले. संबंधित गटातून वाळू नेण्यासाठी रस्ता आहे की नाही याची खातरजमा न करता लाभार्थ्यांना बोलवण्यात आले. त्यामुळे लाभार्थ्यांचा दिवस तर वाया गेलाच परंतु सीनेच्या वाळवंटात खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या अभावी त्यांची मोठी परवड झाल्याचे दिसून आले. तसेच दिवसभर वाट पाहूनही वाहने रिकामीच न्यावी लागल्याने त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागला आहे. महसूल विभागाकडुन दुसरा गट लवकरच मिळेल व लाभार्थ्यांना वाळू मिळेल.ग्रामस्थांशी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आला.अजूनही प्रयत्न चालूच असून घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे -डॉ. अमित कदम, गटविकास अधिकारी, करमाळा.