करमाळा, प्रतिनिधी – अवैध धंदे बंद आहेत असे ठासून सांगितले जात असतानाच करमाळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने चालणाऱ्या चक्री जुगारावर करमाळा पोलिसांनी धाड टाकली आहे. या कारवाईत रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करून हा खेळ चालवणाऱ्या तिघांवर करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पो.कॉ. बापूसाहेब कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २५/०५/२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास करमाळा शहरातील श्रीओम दत्तात्रय झोळे (वय-२७ वर्षे रा. फंड गल्ली, करमाळा) हा फंड गल्ली येथील वेल्डींगच्या दुकानाच्या दुस-या मजल्यावर विनापरवाना, बेकायदेशीर रित्या टि.व्ही. स्क्रिनवर येणारे अंक ऑपरेट करून पैशाची पैज लावून भिंगो ऑनलाईन चक्री जुगार घेत असताना मिळून आला. अधिक तपासा दरम्यान दत्ता भांडवलकर (रा. पिंपळवाडी ता. करमाळा) आणि पिनु मुसळे (रा. तेली गल्ली करमाळा) यांच्यासोबत सदरचा जुगार अड्डा चालवत असल्याचे झोळे यांने सांगितले आहे.

या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी झोळे, भांडवलकर आणि मुसळे यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतीबंधक अधिनियम कलम ४ प्रमाणे गुन्हा नोंद केला असून रोख रुपये ७५० सह सदर ऑनलाईन जुगार चालवण्यासाठी वापरात येणारा सी.पी.यू., टीव्ही स्क्रीन, कीबोर्ड असा एकूण १३,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पो.हे.कॉ. जोतीराम बाळसराफ हे या गुन्हयाचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

