June 11, 2026
IMG-20260530-WA0028

ॲग्रोवन आणि राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या वतीने चर्चासत्र संपन्न

करमाळा, प्रतिनिधी – वनस्पतीच्या वाढ, विकास व उत्पादन या प्रक्रियांमध्ये जिवाणूंची कामगिरी अतिशय महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन जळगाव येथील केळी पीक तज्ञ शरद विसपुते यांनी केले. शनिवारी करमाळा-कुर्डुवाडी रस्त्यावरील बेंद फाटा येथील राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या हॉलमध्ये ॲग्रोवन आणि राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना विसपुते यांनी सांगितले की, वनस्पतीची वाढ, विकास व उत्पादन या प्रक्रियांमध्ये जिवाणूंची कामगिरी शेतकऱ्यांकडून दुर्लक्षित राहते. यामुळे शेतीत भरमसाठ रासायनिक खते घालूनही उत्पादनाची टक्केवारी घटते. यामागील शास्त्र समजून घेण्यासाठी जीवाणूंची साखळी समजून घेणे महत्त्वाचे आहे. वनस्पतीला अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचे काम हे जीवाणुंमार्फत होते. सेंद्रिय कर्ब हे जिवाणूंचे खाद्य आहे. त्यामुळेच जमिनीमध्ये जिवाणूंची संख्या वाढवण्यासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले पाहिजे आणि त्यासाठी जमिनीमध्ये पालापाचोळा, काडीकचरा याबरोबरच सेंद्रिय खत, गांडूळ खत घातले गेले पाहिजे असे विसपुते यांनी सांगितले. ‌

यानंतर जैन इरिगेशनचे किरण पाटील यांनी “निर्यातक्षम केळी व्यवस्थापन” या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. तसेच टेंभुर्णी येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. घनश्याम पेटकर यांनी “एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन” या विषयावर सविस्तर माहिती देत योग्य वेळी नियंत्रण उपाययोजना करण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या परिसंवादाला करमाळा आणि कुर्डूवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रा. बिभीषण मस्कर यांनी सूत्रसंचालन केले. ॲग्री सर्च कंपनीचे राहुल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या सुविधा राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीत मिळतात …

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या उद्देशाने कंपनीने दहा ड्रम युनिट, गांडूळ बेड युनिट ही जैविक निविष्ट तयार करणारे युनिट सुरू केले असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन साठी ‘वावर’ या कंपनीच्या माध्यमातून चिकट सापळे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत‌‌. डॉ.वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे तुरीचे गोदावरी वाण व बायोमिक्स, राहुरी कृषी विद्यापीठाचे बीज प्रक्रिया साठी लागणारे साहित्य आदी बाबी उपलब्ध करून दिल्यामुळे तालुक्यात विषमुक्त शेतीची चळवळ जोमाने वाढत आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!