करमाळा, प्रतिनिधी – महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपींबाबत वेळोवेळी माहिती देऊनही त्यांना अटक केली जात नसल्याचा आरोप मयत महीलेच्या पतीने केला आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्हि.एस. यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात अर्जुनसिंग विजयसिंग परदेशी (रा. दत्तपेठ, करमाळा) यांनी म्हटले आहे की, त्यांच्या पत्नी सौ.आशा अर्जुनसिंग परदेशी (वय-३८) यांनी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या मनिषा रविंद्र शिंगाडे, ओम रविंद्र शिंगाडे व समृध्दी रविंद्र शिंगाडे यांच्या नेहमीच्या मानसिक त्रासाला कंटाळून दि. २४/०४/२६ रोजी स्वतःला पेटवून घेतले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्यानंतर अर्जुनसिंग परदेशी यांनी दि.२९/०४/२६ रोजी करमाळा पोलीसात १)मनिषा रविंद्र शिंगाडे, २)ओम रविंद्र शिंगाडे व ३)समृध्दी रविंद्र शिंगाडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली होती. या तिघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर करमाळा पोलिसांनी आरोपी क्र. १)मनिषा रविंद्र शिंगाडे हीला अटक केली होती तर उर्वरित दोन आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत.
फरार आरोपी क्र.२ आणि ३ हे दोघेही भ्रमणध्वनीव्दारे तसेच समाज माध्यमांद्वारे करमाळा परिसरात संपर्कात असल्याचे निदर्शनास येत असल्याने या गुन्ह्याच्या तपास अधिकारी स.पो.नि. गिरीजा मस्के यांना अर्जुनसिंग परदेशी आणि त्यांच्या नातेवाईकांनी वेळोवेळी माहिती दिली आहे. तरीही आरोपी क्र.२ व ओरापी क्र.३ यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे अर्जदार अर्जुनसिंग परदेशी यांनी म्हटले आहे.
वास्तविक पाहता महिलांविषयी गुन्ह्यांचा तपास करत असताना महिला अधिकाऱ्यांकडून वेगवान व सखोल तपास होणे गरजेचे आहे. मात्र यापूर्वी दाखल गुन्ह्यांमध्येही तपास आधिकारी स.पो.नि. गिरीजा मस्के यांच्यावर तपासात दिरंगाई केल्याचे आरोप आहेत. अशा आरोपांमुळे तालुक्यात गाजलेल्या एका संवेदनशील गुन्ह्याचा तपास स.पो.नि. गिरीजा मस्के यांच्याकडून काढून घेतल्याचे समजते आहे.
पत्नी सौ. आशा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन महिना लोटला तरी तपास केला गेला नसल्याचे सांगत या सर्व गोष्टीला कारणीभूत असलेल्या आरोपी क्र.१,२,३ यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची तसेच आरोपी क्र. २ व ३ यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी विनंती अर्जुनसिंग विजयसिंह परदेशी यांनी शेवटी केली आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आणि आरोपी ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील सायबर टीमशी आम्ही सतत संपर्कात आहोत. फरार आरोपीकडे अद्ययावत कंपनीचे मोबाईल असल्याने सदर कंपन्यांच्या हँडसेटचे लोकेशन मिळण्यास मर्यादा येत आहेत. दाखल गुन्हा अजामीनपात्र असल्याने आरोपींना अटकेशिवाय पर्याय नाही आणि अटकेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गिरीजा मस्के, स.पो.नि. तथा तपास अधिकारी.
.