करमाळा, प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील मांगी तलावातून हाळगाव येथील अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाला पाणीपुरवठा होणार असून ते पाणी शेतीसाठी नेले जाणार नसल्याचा निर्वाळा विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिला आहे. रविवारी रात्री उशिरा एका खाजगी कार्यक्रमादरम्यान करमाळ्यात आले असताना पत्रकारांशी बोलताना ते बोलत होते.

यावेळी अधिक बोलताना प्रा. शिंदे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर कृषी विद्यापीठ हे शासकीय आहे. शासकीय निर्णयानुसारच या कृषी महाविद्यालयाला पाणी नेण्यात येत आहे. हे पाणी शेतीसाठी वापरले जाणार नाही. कोणाच्याही आरक्षणाचे किंवा वाट्याचे पाणी नेले जात नसून राज्यभरातून हाळगाव येथील कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाणी नेले जात आहे.

यावेळी मांगी येथील सुजित बागल यांनी मांगी प्रकल्पाचा कुकडी पाणी वाटपात समावेश करण्याची मागणी केली असता प्रा. शिंदे यांनी या प्रकल्पाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश असल्याचे सांगितले. मात्र कुकडी लाभक्षेत्रातील अतिरिक्त पाणी मांगीला सोडले जात असल्याचे उपस्थितांनी सांगितल्यानंतरही मांगी मध्यम प्रकल्प कुकडी लाभक्षेत्रातच असल्याचे प्रा. शिंदे यांनी निक्षून सांगितले.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना तसेच खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांना केलेल्या शिवीगाळी बाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला मात्र प्रा. शिंदे यांनी पत्रकारांना उत्तरे देण्याची टाळून पुढील नियोजन कार्यक्रमासाठी काढता पाय घेतला.

.

.

.

.

