भाविकांना दर्शनासह महाप्रसादाचा लाभ
करमाळा, प्रतिनिधी – ज्या अबालवृद्ध, महिला आणि दुरवरच्या भक्तांना अक्कलकोट येथे येणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुका परिक्रमेचे आयोजन करण्यात येते. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या या पालखी-पादुका परिक्रमेचे आज गुरुवार दि.०२ रोजी करमाळा शहरात आगमन होणार आहे.

शहरातील फंड गल्ली येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखी सोहळ्याच्या आगमनाची यंदा २७ वे वर्ष आहे. पालखी पादुका परिक्रमेनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही खंड गल्ली येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

या सात दिवसांत सकाळी पारायण, प्रवचन आणि रात्री हरिपाठ व हरिकीर्तन असा दररोजचा कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर आज पालखी परिक्रमेची उत्कंठा फंड गल्ली सह सर्वच स्वामी भक्तांना लागली आहे. आज सकाळी ह.भ.प. विवेकानंद मंजरतकर महाराज यांचे कालनिर्णयात्मक कीर्तन होणार असून सायंकाळी ५ वाजता श्री स्वामी समर्थ पालखी पादुकांचे आगमन होईल. सायंकाळी ८ वाजता महाआरती तर त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

सायंकाळी ठिक ५ वाजता शहरातील पोथरे नाका येथे श्रींच्या पालखी-पादुका परिक्रमेचे फंड गल्ली येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येणार असून येथून मंडळाचे कार्यकर्ते पालखी खांद्यावर घेऊन वाजत गाजत फंड गल्ली येथे आणणार आहेत. पोथरे नाका-फुलसौंदर चौक-जय महाराष्ट्र चौक-गुजर गल्ली-भवानी पेठ-छत्रपती चौक-दत्तपेठ-सुभाष चौक-मेन रोड-नागराज गल्ली ते फंड गल्ली येथील श्री स्वामी समर्थ मंदिर असा या पालखी परिक्रमेच्या मिरवणुकीचा मार्ग असणार आहे.

या पालखी परिक्रमेनिमित्त शहरातील नागरिकांनी सायंकाळी मिरवणूक मार्गात कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्याची तसेच महिला भाविकांनी मिरवणूक मार्गावर सडा-रांगोळी करून स्वच्छता राखण्याचे आणि सायंकाळी आरती आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि फंड गल्ली येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

.

.

.

