इयत्ता पहीली पासूनची आमची दोस्ती….
दहावीनंतर वाटा बदलल्या. शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक मित्र आले आणि गेले. कॉलेज वयात अनेक नवीन मित्र मिळाले.

लहानपणी सुतार गल्लीतल्या सागर टॉकीजला लागलेले अनेक चित्रपट पाहीले. त्याकाळी आतासारखे फालतू थिम वरचे चित्रपट नव्हते. तीन किंवा चार अक्षरी नावाचे चित्रपट असले तरी या चित्रपटांच्या कथानकात त्या टायटलचा तब्बल तीन तास विस्तार असे आणि या विस्तारातून प्रेक्षकांना जीवनाचा एक पैलू दाखवला जाई आणि त्या पैलूचा प्रेक्षकाच्या मनावर खोल परिणाम होई.

कौटुंबिक जिव्हाळा किंवा कलह, मान-अपमान किंवा स्वाभिमान, दोन परस्पर-विरोधी घराण्यांतील प्रेम प्रकरणे, भावा भावांतील प्रेम किंवा वैर, मैत्री किंवा मैत्रीत गद्दारी, लिखित-अलिखित नियम आदी विषयांवर हे चित्रपट आधारलेले असत. दिवार, नसीब, शराबी, अवतार, स्वर्ग, याराना, खुदगर्ज, मर्द असे अनेक चित्रपट लहानपणी मनावर कोरले गेले.

या चित्रपटांमधुन काहींनी चांगले घेतले तर काहींनी वाईट घेतले. त्यातूनच आमची पिढी पुढे घडत गेली आणि लहानपणी पाहिलेल्या चित्रपटांच्या कथानकांचा मनावर असलेला पगडा घेऊन शालेय व कॉलेज जीवन जगत आलो.

दोस्ती, खुदगर्ज, याराना, शोले या चित्रपटांतील मैत्रीच्या पैलूंवरच आयुष्यातील आतापर्यंतची यारी-दोस्ती-दुनियादारी घडत गेली आणि अनेक चांगले वाईट मित्र जीवन जगण्याचा अनुभव देत गेले. वाईट अनुभव देणारे अनेक जण असले तरी चांगले अनुभव देणारे मात्र दोन-तीनच निघाले आणि या दोघा-तिघांत आतापर्यंत एव्हरग्रीन असलेला आमचा मित्र तेजस चव्हाणचा आज वाढदिवस…!!!

योगेश टॉकीज घराजवळच असल्याने दिवसभर वेगवेगळ्या चित्रपटांतील डायलॉग कानी पडल्याने मी मान, अपमान, स्वाभिमान, खुद्दारी अशा अनेक पैलूंतून काहीसा आक्रमक झालो असलो तरी तेजसने मात्र दोस्ती, नम्रता, एकत्र कुटुंब पद्धती, आईवडीलांचा सन्मान असे बरेचसे चांगले गुण घेतले आहेत. या गुणांमुळे त्याचा मित्रपरिवार तर मोठा आहेच, पण वडील कै. पोपट काकांच्या मृत्युनंतर घरातील कर्त्या माणसाची जबाबदारी कमी वयातच त्याच्या खांद्यावर पडली असली तरी आईसह दोन भाऊ आणि स्वतःसह भावांच्या पत्नी मुले-मुली अशा संपूर्ण कुटुंबाला एक विचाराने ठेवण्यात तो यशस्वी ठरला आहे.

आमची मैत्री निरंतर असली तरी माझ्या आक्रमक स्वभावामुळे अनेक वेळा आमच्यात बेबनाव होतो. मात्र तेजस आपल्या नम्र स्वभावानुसार दरवेळी नमते घेऊन आमची मैत्री ही निरंतर ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या स्वभावामुळेच त्याची आठवण आली की, खुदगर्ज चित्रपटातील
“कुछ भी नही रहता दुनिया मे लोगो…
रह जाती है दोस्ती…,
जिंदगी का नाम दोस्ती…
दोस्ती का नाम जिंदगी” या गाण्याचे बोल कानात घुमू लागतात.

तसं तर आमची मैत्री दाखवून जतवण्याची नसली तरी आजकालच्या प्रचलित पद्धतीनुसार मलाही समाज माध्यमांद्वारे त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणे क्रमप्राप्त असल्याचे मी मानतो…,
.
.
.
मैत्रीच्या जीवनातला खराखुरा राजा माणूस तेजस चव्हाण याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!

.

