September 4, 2026
जामीन

न्यायालयाच्या आदेशानंतर करमाळा तालुक्यातील पाच जणांवर गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी – पूर्वी विक्री केलेल्या जमिनीचे पुन्हा साठेखत व खरेदीखत करून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची वारंवार मागणी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर फिर्यादीला न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी तालुक्यातील पाच जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तालुक्यातील उमरड येथील धनाजी अर्जुन निंबाळकर (वय-६१ वर्षे, हल्ली रा. पाटबंधारे वसाहत, सरकार चौक, दौंड, जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी विद्या प्रभाकर जाडकर (वय -४२ वर्षे, रा. चिखलठाण नं.१ ता. करमाळा), बिभीषण बाबीर जाधव (वय ४७, रा. अंजनडोह, ता. करमाळा), सुरेखा बाबीर जाधव (वय ६८ वर्षे, रा. अंजनडोह, ता. करमाळा), भाऊसाहेब शामराव गायकवाड (वय-४८ वर्षे, रा. वीट, ता. करमाळा) यांनी पूर्वी विक्री केलेल्या जमिनीचे पुन्हा साठेखत व खरेदीखत करून फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून दि.२५/०२/२६ रोजी करमाळा पोलीस निरीक्षक, करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जात संबंधितांची चौकशी करून भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यानंतर ६ मार्च २०२६ रोजीही निंबाळकर यांनी आरोपी विद्या जाडकर, बिभिषण जाधव, सुरेखा जाधव, भाऊसाहेब गायकवाड आणि अमितसिंह अनिलसिंह परदेशी (वय-३३ वर्षे, रा. अंजनडोह, ता. करमाळा) यांच्याविरुद्ध पुन्हा करमाळा पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. मात्र, त्यावरही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

तसेच २३ जून २०२६ रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन निंबाळकर यांनी पुन्हा लेखी तक्रार दिली. मात्र, त्यानंतरही पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने न्याय मिळण्यासाठी निंबाळकर यांना न्यायालयात फिर्याद दाखल करावी लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर करमाळा पोलिसांनी आरोपी विद्या प्रभाकर जाडकर, बिभीषण बाबीर जाधव, सुरेखा बाबीर जाधव, भाऊसाहेब शामराव गायकवाड आणि अमितसिंह अनिलसिंह परदेशी या पाच जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून स.पो.नि. गिरीजा म्हस्के या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!