September 11, 2026
IMG-20260910-WA0080

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील कुंभारगावातील कुटुंब महिला शेतकरी गटाने गटशेतीच्या माध्यमातून योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि परस्पर सहकार्याच्या जोरावर तूर पिकाची उत्तम जोपासना केली आहे. हवामान बदल व एल निनोचा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन गटाने योग्य पीक नियोजन केल्याने अवर्षणग्रस्त परिस्थितीतही कुंभारगावातील महिला शेतकरी गटाची तूर बहरली आहे.

या शेतकरी गटाकडून पाण्याचा प्रमाणबद्ध वापर, ठिबक सिंचन, योग्य वाणाची निवड, उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, रोपांतील व ओळींतील योग्य अंतर, सरी-वरंब्यावर टोकण आदी बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. तसेच जीवामृत, ४५ दिवसांनंतर शेंडा खुडणी, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, चिकट सापळे, कामगंध सापळे व प्रकाश सापळ्यांचा वापर करून तूर पिकातील सर्व एसओपीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे या भागातील तूर पिकाची वाढ जोमदार झाली आहे.

गटातील महिला शेतकरी एकमेकांच्या शेतावर विविध कामे ‘इर्जीक’ पद्धतीने करत असल्याने मजुरी खर्चात बचत होत आहे. तसेच निविष्ठांची सामूहिक खरेदी केल्यामुळे खर्चातही मोठी बचत होत आहे.

दरम्यान, पावसाचा मोठा खंड पडल्याने काही सदस्यांच्या शेतातील पिकांना पाण्याची कमतरता निर्माण झाली. यावेळी गटातील सदस्यांनी ‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे आपल्या विहिरीचे पाणी गरजू शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे गटातील सर्व शेतकऱ्यांच्या तूर पिकाला आवश्यक पाणी मिळून उत्पादन चांगले उत्पादन मिळणार आहे.

आजच्या बदलत्या परिस्थितीत गटशेती ही काळाची गरज बनली असून, कुंभार गावातील कुटुंब महिला शेतकरी गटाने नावाप्रमाणेच एका कुटुंबासारखे काम करत परस्पर सहकार्याचा आदर्श निर्माण केला आहे. हा गट परिसरातील इतर शेतकरी गटांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!