करमाळा, प्रतिनिधी – शहरातील सुभाष चौक या वर्दळीच्या ठिकाणी शनिवारी छोट्या रिक्षा चालकाचा मोठा प्रताप अनुभवास आला. पेट्रोल इंजिन वर चालणाऱ्या रिक्षा मध्ये हा अल्पवयीन रिक्षा चालक आपल्या अल्पवयीन मित्रांना मागे बसवून भर दुपारी आणि भर चौकातून रिक्षा दामटत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

त्याचे झाले असे की, शहरातील मुख्य पेठेतील अरुंद रस्ते आणि नागरिकांची वाहने लावण्याची अजब-गजब पद्धत यामुळे सामान्य नागरिक आधीपासूनच त्रस्त असताना शनिवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास वर्ष दहाच्या आसपास वय असलेला एक अल्पवयीन रिक्षा चालक आपल्या अल्पवयीन मित्रांना मागे बसवून रिक्षा चालवताना आढळला. या छोट्या रिक्षा चालकाला पाहून रस्त्यावरील दुकानदारांसह इतर पादचारी आश्चर्याने पाहत असतानाच हा छोटा रिक्षा चालक मात्र बिनधास्तपणे रिक्षा दामटत होता. समोरून मोठी चार चाकी येत असतानाही आपल्या वयाची भान विसरून हा रिक्षा चालक इतरांना आपल्या दुचाकी बाजूला घेण्याचे उपदेश देत होता.

त्याचा हा अविर्भाव पाहून उपस्थितांनी आपल्या दुचाकी मुकाट्याने बाजूला घेत या धडाकेबाज रिक्षा चालकाला वाटही करून दिली. यानंतर हा चिमुकला रिक्षा चालक रिक्षा दामटत पुढे निघून गेला असला तरी त्याच्या मागे या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक त्याच्या पालकांच्या बेफिकिरीची चर्चा करत असताना दिसले. पंधरा-सोळा वर्षाच्या मुलांकडे दुचाकी आढळल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल होण्याचे प्रावधान असताना या चिमुकल्या रिक्षा चालकाला पाहून त्याच्या पालकांना कायद्याचा धाक आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे.

.

.

