October 27, 2026
IMG-20261023-WA0018

कुंभेज फाटा येथील बैठकीला दिग्गजांची उपस्थिती; इंदापूर भागातील शेतकरीही सरसावले

करमाळा, विशाल परदेशी – उजनी धरणावर उभारल्या जाणाऱ्या विध्वंसक प्रकल्पांना विरोध करण्यासाठी गुरुवार दि.२२ रोजी सकाळी १० वाजता तालुक्यातील विविध राजकीय पक्षांसह धरणग्रस्त शेतकऱ्यांची बैठक पार पडली. कुंभेज फाटा येथील सुप्रीम हॉटेलच्या फंक्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला करमाळ्यासह इंदापूर तालुक्यातील दिग्गज पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

यावेळी उजनी धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर ॲड. सविता शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून उजनी वरील होऊ घातलेल्या गंभीर प्रकल्पांची दाहकता आणि प्रकल्प उभारणीनंतर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. याशिवाय इंदापुर तालुक्यातील रांजणी येथील संदीप माने, इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रा.कृष्णा ताटे, शेलगाव (वां) येथील उदयसिंह देशमुख, नगोर्ली (टेंभुर्णी) येथील सौरभ आरकीले, पुणे जिल्हा मच्छिमार संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम नगरे, सचिन गावडे, चिखलठाणचे अविनाश सरडे, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जिंती येथील सविताराजे राजेभोसले इत्यादींनी या विध्वंसक प्रकल्पांचा आपल्या परिसराला कोणताही फायदा होणार नसून या प्रकल्पांमुळे होणाऱ्या उत्सर्जनामुळे उजनीतील पाणी, भोवतालची जमीन आणि परिसर, वातावरण आणि उजनीतील माशांसह इतर जैवविविधता नष्ट होणार असल्याचे नमूद करत या प्रकल्पामुळे केवळ नुकसानच होणार असल्याचे सांगत या प्रकल्पाच्या विरोधासाठी भीमानगर येथे होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनासाठी जास्तीत जास्त सामाजिक, राजकीय क्षेत्रासह करमाळा, माढा, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या वाहनांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

सोलापूर जिल्ह्यासह परिसराच्या पेयजल आणि शेतीसाठी उजनी धरणाचा मोठा आधार आहे. मात्र उजनी धरणासाठी त्याग केलेल्या धरणग्रस्तांना अंधारात ठेवून धरणावर विध्वंसक प्रकल्प उभारण्याचा घाट घातला जात आहे. उजनीच्या पाण्याव्यतिरिक्त जलाशयाकडेची गाळपेर जमीन, उजनीतील मासेमारी व्यवसाय, मोडीत काढण्यासाठी सुरू असलेल्या या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी निर्माण केलेल्या या चळवळीला माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, करमाळा तालुक्याचे आमदार नारायण पाटील, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीपासून पाठिंबा दिलेला आहे. सध्या शिक्षक, पदवीधर आमदार निवडणूक प्रचार सुरू असून तालुक्यातील इतर राजकीय गट आणि पक्षातील पुढारी आणि कार्यकर्ते या चळवळीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष धनंजय डोंगरे, चिकलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत सरडे, कुगाव येथील प्रगतिशील बागायतदार धुळाभाऊ कोकरे, कोंढार चिंचोलीचे माजी सरपंच तथा आरटीआय कार्यकर्ते देविदास साळुंखे यांच्यासह उजनी धरणग्रस्त भागातील अनेक शेतकरी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी उजनी धरणग्रस्त समितीचे उपाध्यक्ष भारत साळुंखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!