कारचालक डॉक्टर ताब्यात
करमाळा, विशाल परदेशी – दुष्काळाच्या झळा सोसत असताना पाण्याअभावी शेतीत काम नसल्याने बांधकामावर कामाला जाणाऱ्या शेतकऱ्याचा कारच्या धडकेत जागीच अंत झाला आहे. शुक्रवारी सकाळी सालसे-परंडा रोडवर ही घटना घडली असून संबंधित कारचालक हा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर असल्याचे समजते आहे.

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, करमाळा शहरातील डॉक्टर महेश भोसले हे बार्शी उप जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी ते आपल्या कार क्र. एम एच 13 इ एस 2526 मधून परंड्याकडून सालसेच्या दिशेने येत होते. यावेळी सालसे गावालगत आल्यानंतर डॉक्टर भोसले यांच्या कारची रस्त्यावरून चालत सालसेच्या दिशेने निघालेल्या मिनीनाथ बसवेश्वर सपकाळ (वय-४५, रा.सालसे, ता.करमाळा) या सेंट्रींग कामावर निघालेल्या कामगारास पाठीमागून जोरात धडक बसली. या धडकेमुळे सपकाळ हे गंभीर जखमी झाले. यावेळी डॉक्टर भोसले यांनी जखमी मिनीनाथ याला कार मध्ये घेऊन करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.

यानंतर डॉक्टर महेश भोसले यांना करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून करमाळा पोलीस स्टेशन येथे या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू आहे. तसेच मिनीनाथ यांच्यावर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरू आहे.

अपघाताचे वृत्त कळल्यानंतर सालसे गावातील ग्रामस्थांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालयासमोर गर्दी केली. अत्यंत शांत स्वभाव असलेल्या आणि आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या मिनीनाथ बसवेश्वर सपकाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. मयत मिनीनाथ यांच्या पाठीमागे आई-वडील पत्नी दोन मुले आणि एक मुलगी आहे.

.

.

