June 10, 2026
IMG-20260603-WA0058

गोदावरी 2013-41 वाणाची राज्याबाहेरही वाढती लोकप्रियता

करमाळा, प्रतिनिधी – डॉ. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेल्या गोदावरी 2013-41 या तुरीच्या वाणाने करमाळा तालुक्यात विक्रमी उत्पादन देत शेतकऱ्यांच्या यशाचा नवा अध्याय लिहिला आहे. या वाणाच्या यशामुळे त्याचा प्रचार-प्रसार आता महाराष्ट्राच्या सीमाही ओलांडत असून राज्याबाहेरील शेतकरीही करमाळ्याकडे प्रेरणास्थान म्हणून पाहू लागले आहेत.

सन 2023 मध्ये कुंभारगाव ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीला ‘फार्मर कप’ स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्यानंतर करमाळा तालुका राज्याच्या प्रकाशझोतात आला. त्यानंतर 2024 मध्ये या चळवळीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. फिसरे येथील प्रगतशील शेतकरी तथा कृषी योद्धा हनुमंत रोकडे यांनी एकरी तब्बल 21 क्विंटल तूर उत्पादन घेऊन विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या यशोगाथेचे व्हिडिओ विविध यूट्यूब चॅनेलवर प्रसारित झाल्यानंतर महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांतील शेतकऱ्यांचे लक्ष या वाणाकडे वेधले गेले.

याच पार्श्वभूमीवर खरीप हंगाम 2026 च्या प्रारंभी तेलंगणा राज्यातील जहीराबाद येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकर रेड्डी, मुरलय्या आणि प्रशांत रुस्तुम यांनी हनुमंत रोकडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर 3 जून रोजी त्यांनी करमाळा येथील राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी, शाखा क्रमांक 2, बेंद फाटा येथे भेट देऊन गोदावरी 2013-41 या वाणाचे सुमारे 36 किलो बियाणे खरेदी केले.

या बियाण्याच्या माध्यमातून ते सुमारे 30 ते 35 एकर क्षेत्रावर तुरीची लागवड करणार आहेत. तसेच लागवडीतील अंतर, बीजप्रक्रिया, आंतरपीक पद्धती आणि पीक व्यवस्थापनाबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन घेतले.

गोदावरी 2013-41 या वाणाच्या यशस्वी प्रसारात करमाळा तालुका आणि राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी सांगितले. शेतकऱ्यांची एकजूट, आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब आणि ‘फार्मर कप’सारख्या प्रेरणादायी उपक्रमांमुळे हे यश शक्य झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी साधलेल्या या कृषी यशामुळे आता राज्याबाहेरील शेतकरीही येथे येऊन मार्गदर्शन व बियाणे खरेदी करत असून, करमाळा तालुका तूर उत्पादनाच्या क्षेत्रात एक आदर्श मॉडेल म्हणून उदयास येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!