May 6, 2026
IMG-20260506-WA0016

करमाळा, प्रतिनिधी – धनकवडी (पुणे) येथील व्यापा-याने करमाळा पोलीसात मनोहर भोसले विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर करमाळा पोलिसांनी मामासह त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन मंगळवारी करमाळा न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने भोसलेसह त्याच्या साथीदारांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्यवसायात यश व मणक्याचा त्रास दूर करतो म्हणून मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांनी आर्थिक फसवणूक केल्याबद्दल धनकवडी येथील दलाराम सुतार यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दाखल केली होती. तथापि यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात हे दोघेही आरोपी कुर्डूवाडी पोलिसांच्या ताब्यात होते. दरम्यान करमाळ्यात गुन्हा दाखल केल्यानंतर करमाळा पोलिसांनी तपासा दरम्यान भोसले यांच्या घोटी येथील आश्रमातील व्यवहार पाहणाऱ्या नरेंद्र सांगळे याला ताब्यात घेतले होते.

मंगळवारी या तीनही संशयित आरोपींना करमाळा न्यायालयात उभे करण्यात आले. यावेळी न्यायाधीश शर्मा यांनी मनोहर भोसलेसह तिघांना पोलीस तपासासाठी आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

करमाळा तालुक्यातील उंदरगाव व घोटी येथे आश्रम चालवणाऱ्या मनोहर भोसले याच्यावर कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात पन्नास हजाराच्या फसवणूक प्रकरणी झालेल्या गुन्ह्यात माढा येथील न्यायालयाने मनोहर भोसले सह अन्य साथीदारांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान करमाळा पोलिसात झालेल्या दाखल गुन्ह्यात मनोहर भोसले यास मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता करमाळा येथील न्यायालयात प्रचंड बंदोबस्तात आणण्यात आले. यावेळी सरकारी अभियोक्ता ॲड. वाघमारे यांनी व आरोपीच्या वतीने ॲड. सुभाष हुल्याळकर यांनी जोरदार युक्तिवाद केला.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!