पावसाच्या धांदलीत फेरीवाल्या महिलेची रोख रक्कम गहाळ
करमाळा, प्रतिनिधी – ढग दाटून आल्याने उन्हाचा तडाखा ओसरत असतानाच करमाळा शहरात भर दुपारी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झाले आहे.

शहरात गुरुवारी सकाळपासूनच ऊन सावलीचा खेळ सुरू होता. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या कडक उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळत असतानाच दुपारी सव्वा एकच्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटल्याने वातावरण ढवळून निघाले. यासोबतच जोराचा पाऊसही सुरू झाल्याने शहरातील नागरी वस्तीसह बाजारपेठेतील फेरीवाले व दुकानदार यांचीही तारांबळ उडाली. यादरम्यान शहरात उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मोठ्या वस्त्रदालनाच्या महागड्या साईन बोर्डसह अनेक दुकानांचे तसेच जाहिरातींचे फलक निखळून पडले.

यावेळी सोलापूर आगाराची माढा मार्गे सोलापूरला निघालेली नाशिक-सोलापूर ही प्रवाशांनी भरलेली बस शहरातील बायपास चौकाजवळ आली असताना चौकातील फेरीवाल्यांपैकी ज्योती साळुंखे या केळी विक्रेत्या महिलेचा हातगाडा वाऱ्याच्या वेगामुळे या बसवर येऊन धडकला. या धडकेमुळे हातगाडी वरील केळी तर पडलीच पण हातगाडीच्या टपात आतून खोचलेले रु.५००० चे पाकीटही गहाळ झाले. हातगाडीचा वरील कोपरा एसटी बसच्या काचेवर लागल्याने बसची काच फुटली आहे .

याबरोबरच जोरदार वाऱ्यामुळे बायपास चौकाच्या पुढे थोरात या कष्टकरी कुटुंबाची रसवंती आणि खाद्यपदार्थांची टपरी पलटी झाली. यामुळे टपरीत असलेला युवक अडकून बसला. जोरदार वादळ आणि पावसामुळे मदतीसाठी कोणीही धजत नसताना टपरी चालक दादा बोराडे आणि त्यांच्या पत्नी कविता यांनी त्यांचा मुलगा सौरभ याला मोठ्या प्रयत्नाने टपरी बाहेर काढले. टपरीत अडकल्यामुळे सौरभ यांच्या कोपराला मुका मार लागला आहे तर टपरी पलटी झाल्यामुळे टपरी मध्ये असलेला डीप फ्रीज, रसवंती मशीन आणि खाद्यपदार्थांच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले.

पावसामुळे झालेल्या तिसऱ्या घटनेत करमाळा शहरातील देवीचा रोड लगत जवळा येथील हजारे यांच्या नव्याने सुरू होत असलेल्या कंपनी आउटलेटच्या भव्य दालनावरील ४० बाय १० फूट मापाचा आणि रु. साडेतीन लाख किंमतीचा भव्य ग्लो साईन बोर्ड जोरदार वाऱ्यामुळे निखळून पडला. उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना भव्य असा बोर्ड दुकानाच्या समोरच पडल्याने हजारे कुटुंबातील लहान मुलांसह महिलांनीही हा बोर्ड बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ या कवितेप्रमाणे केवळ अर्धाच तासाच्या थैमानानंतर केळी विक्रेत्या ज्योती साळुंखे, रसवंतीची टपरी चालवणारे थोरात कुटुंब आणि करमाळा शहरात नव्याने वस्त्र दालन सुरू करण्याच्या विचारात असलेल्या हजारे कुटुंबातील सदस्यांचे आपापले व्यवसाय सावरण्याचे प्रयत्न पाहून बघ्यांचे डोळे मात्र पाणावले.

.

