करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील खडकी येथील सीना नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर हल्ला झाल्याची घटना ३ जूनच्या मध्यरात्री घडली. या प्रकरणी एका नामनिर्देशित आरोपीसह ६ ते ७ अज्ञात इसमांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विशाल विक्रम कोल्हे (वय-२९ वर्षे ,ग्राम महसूल अधिकारी, खडकी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते ग्राम महसूल अधिकारी आदित्य मस्तुद, महसूल सेवक व पोलीस पाटील यांच्यासह ३ जून रोजी रात्री सुमारे ११.३५ वाजता खडकी येथील सीना नदीपात्रात पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी अंगद नामदेव वाळूजकर (रा. जवळा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) व त्याच्या साथीदारांनी डंपिंग ट्रॅक्टरमध्ये अंदाजे सव्वा ब्रास वाळू कोणताही वैध परवाना अथवा पास नसताना उत्खनन करून वाहतूक केल्याचे आढळून आले.

यावेळी महसूल पथकाने कारवाई सुरू करताच आरोपींनी विरोध करत ग्राम महसूल अधिकारी विशाल कोल्हे यांच्यावर दगडफेक करून त्यांना जखमी केले. तसेच महसूल पथकाने ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर परत घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), १३२, १२१(१) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ९ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अझरुद्दीन शेख करीत आहेत.

.

.

.

.

