May 28, 2026
IMG-20260525-WA0003

सुदैवाने जीवित हानी टळली

करमाळा, प्रतिनिधी – दहा नवीन बसेस आल्यानंतरही करमाळा आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय पाचवीला पुजली असल्याचेच चित्र आहे. विविध मार्गांवर मार्गावर बंद पडणाऱ्या बसेसचे सत्र सुरू असतानाच रविवारी सकाळी करमाळा आगाराची बस नियोजित मार्गावर निघाली असताना चालू बसची डिझेल टाकी निखळून पडल्याची घटना घडली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार करमाळा आगाराची एम एच 11 बी एल ९४२६ ही बस रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास करमाळा ते वाशिंबे या मार्गावर मार्गस्थ झाली. प्रवाशांनी भरलेली ही बस आगारातून बाहेर निघून करमाळा पोस्ट ऑफिस, न्यायालय या मार्गाने केतुर नाक्याकडे निघालेली असतानाच सिद्धार्थ नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळे समोरून जात असताना अचानक या बसची डिझेल टाकी निखळून पडली. दरम्यान मोठा आवाज झाल्याने चालकांने प्रसंगावधान राखत ही बस नियंत्रित केली. त्यामुळे सदर डिझेलची लोखंडी टाकी रस्त्यावर घासून ठिणग्या निर्माण होऊन टाकीतील डिझेल पेटण्याचा संभावित धोका टळला.

सदर प्रकारामुळे या बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. दरम्यान यानंतरच्या या मार्गावर सुटणाऱ्या बस मधून सदर प्रवाशांना पुढील प्रवासासाठी बसवण्यात आले. रविवारी घडलेल्या या प्रकारामुळे करमाळा आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!